पुण्याचे खासदार शिरोळेही दिल्लीत बेघर

shirole
दिल्ली – पुण्याचे खासदार अनिल शिरोळे २४ जूनला दिल्लीला रवाना होत आहेत मात्र त्यांनाही अजून दिल्लीत घर मिळालेले नसल्याने हॉटेल अशोक मध्येच मुक्काम करावा लागणार आहे. गेल्या महिनाभर शिरोळे दिल्लीत घर मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत मात्र त्यांना घर मिळायला अजून किमान ६ महिने तरी वाट पहावी लागणार आहे. प्रथमच खासदार बनलेल्या शिरोळे यांच्याप्रमाणेच अन्य ३१५ नवे खासदारही घरे मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.

माजी खासदार आणि मंत्र्यांना घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्यानंतरही अनेकांनी अद्यापी घरे खाली केलेली नाहीत. त्यामुळे नवीन सरकारमधील अनेक खासदारांना हॉटेलात मुक्काम करावा लागत आहे. शिरोळे म्हणाले की सुरवातीला आठ दिवस त्यांनी महाराष्ट्र सदनात मुक्काम केला होता मात्र त्यानंतर त्यांना अशोका या पंचतारांकित हॉटेलात रूम देण्यात आली आहे. या रूमचे दिवसाचे भाडे आहे ६ हजार रूपये.

नोटिसा बजावलेले माजी खासदार व मंत्री या महिन्यात घरे खाली करतील मात्र पुढची सर्व प्रक्रिया होऊन प्रत्येक खासदाराला घर मिळण्यासाठी सहा महिने लागतील असे सांगितले जात आहे. खासदारांना टाइप चार व पाच ची घरे दिली जातात. यात चार बेडरूम्स व स्टडी रूम असते तर कॅबिनेट मंत्र्यांना टाईप आठचे मोठे बंगले दिले जातात. शिरोळे यांच्या म्हणण्याप्रमाणे ते प्रथमच खासदार झाले असल्याने त्यांना फ्लॅट दिला जाईल फक्त तो कधी मिळेल हे सांगता येत नाही.

Leave a Comment