कौशल्यांकडे दुर्लक्ष नको

education
देशाचे चित्र बदलायचे असेल तर शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या देशातल्या सगळ्या नेत्यांना त्याची जाणीव आहे. परंतु आपला शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. आपण शिक्षणाकडे नोकरी मिळवण्याचे साधन म्हणून बघतो. मुलांच्या वृत्ती, प्रवृत्तीत आणि विचार करण्याच्या पध्दतीत बदल घडविण्याचे साधन म्हणून आपण बघतच नाही. त्यामुळे आपल्या देशात शिक्षणाचे प्रमाण वाढले पण शिक्षणाचा पाहिजे तो प्रभाव वाढला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावावर बोलताना कौशल्य विकासावर फार भर दिला होता. त्यांनी आता शिक्षणाकडे निरनिराळी कौशल्ये विकसित करण्याचे साधन म्हणून बघावे तर त्यांचे उद्दिष्ट साध्य होईल कारण देशाच्या नागरिकांमध्ये निरनिराळी कौशल्ये नसतील तर देशाचा विकास होणे शक्य नाही. किंबहुना ज्या ज्या देशांनी प्रगतीचे नवनवे शिखर पादाक्रांत केले आहे त्या देशांनी ते केवळ जनतेच्या कौशल्याच्या जोरावरच पादाक्रांत केले आहे. भारतीयांतही अशी कौशल्ये आहेत आणि ती विकसित करून आपण अमेरिकेएवढे पुढे जाऊ शकतो. तेवढी गुणवत्ता आपल्यात आहे हेच भारतीय लोकाना माहीत नाही. म्हणून देशातल्या तरुणांना अनेक प्रकारची कौशल्ये आत्मसात व्हावीत अशी शिक्षण व्यवस्था आपण राबवणार आहोत असे, मोदी यांनी म्हटले आहे.

आपल्या देशातल्या सध्याच्या शिक्षणाला दिशा नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारतीय समाजातून चांगले कारकून मिळावेत म्हणून ही शिक्षण व्यवस्था सुरू केली आहे असे म्हटले जाते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, या शिक्षण व्यवस्थेतून चांगले कारकूनसुध्दा तयार होत नाहीत. खरे म्हणजे देशाची उभारणी दोन गोष्टीवर होत असते. शिक्षण आणि आरोग्य. हे सर्वांना माहीत असुनसुध्दा आपल्या देशामध्ये नेमक्या या दोन गोष्टीकडे दुर्लक्ष आहे. हे अक्षम्य दुर्लक्षच आपली प्रगती न होण्यामागचे सर्वात मोठे कारण आहे. म्हणून आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शिक्षणाच्या या पैलूकडे बारकाईने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही अपेक्षा व्यक्त करताना शिक्षणाकडे बघण्याचा सरकारचा आणि समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. शिक्षणक्षेत्रामध्ये एक मोठी विसंगती लक्षात येेते. ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे किंवा आकलनाचे मूल्यमापन करण्याची चुकीची पध्दती आपण शिक्षणातून मुलांना हुशार बनवतो. किंबहुना तसा दावा करतो. परंतु त्याच्या पूर्ण वर्षभरातल्या कामगिरीचे आकलन तीन तासाच्या उत्तरपत्रिकेवरून करतो. त्यामुळे पुस्तकातली उत्तरे तोंडपाठ करून ती तशाचतशी परीक्षेत उतरवणे म्हणजे हुशारी असा विक्षिप्त विचार बळावला आहे. या पध्दतीला मराठवाड्यात ‘घोका आणि ओका’ असे म्हणतात. म्हणजे वर्षभर घोकत रहा.

या तीन तासातल्या कामगिरीवरच मुलांना गुणवत्तावान ठरवतो. खरे म्हणजे ही गुणवत्ता आकलनाची नसते. ती गुणवत्ता अन्य कोणत्याही गुणाची नसते तर ती केवळ स्मरणशक्तीची गुणवत्ता असते आणि याही गुणवत्तेच्या चुकीच्या मापानुसार ज्यांना ९० टक्के गुण मिळतात. त्यांना हुशार ठरवून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाते. मात्र ५० टक्क्यांपासून ९० टक्क्यांपर्यंत गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. ही मुले समाजाच्या, देशाच्या काही उपयोगाचीच नाही असे मानून त्यांची उपेक्षा केली जात असते. या मुलांमध्ये घोकमपट्टी करून उत्तर पत्रिका लिहिण्याचे कौशल्य नसेल परंतु यासाठी आवश्यक असणारी स्मरणशक्ती हेच काय जीवनाचे कौशल्य आहे का? जीवन यशस्वी करण्यासाठी आणि ते समाजाच्या उपयोगी ठरावे म्हणून माणसाच्या अंगी असलेल्या अनेक गुणांचा उपयोग होत असतो. स्मरणशक्ती चांगली आहे म्हणून एखादा माणूस जीवनातल्या काही कसोटीच्या प्रसंगातून पार पडला असे काही आढळत नाही.

उलट निर्णय घेण्याची क्षमता, चांगले संवाद कौशल्य, कला, क्रीडा कौशल्य, नेतृत्व गुण हेही आवश्यक गुण आहेत आणि त्या गुणांच्या जोरावर अनेकांनी आपले आयुष्य सार्थकी लावले आहे. तसेच समाजालासुध्दा काहीतरी दिलेले आहे. म्हणून शाळांमध्ये मुलांच्या अंगी असलेल्या याही गुणांचा विकास करण्याची योजना असली पाहिजे. जगातल्या अनेक शास्त्रज्ञांच्या चरित्राकडे पाहिल्यास असे लक्षात येेते की ते सगळेच शास्त्रज्ञ केवळ अभ्यासात हुशार होते म्हणून शास्त्रज्ञ झाले असे काही घडलेले नाही. प्रचलित अर्थाने ज्या मुलांना हुशार म्हणत असतो. अशा हुशार मुलांत त्यांची गणना केली जात नव्हती. पण पुढे ते केवळ देशालाच नव्हे तर मानवतेला वळण लावणारे संशोधन करू शकले. तेव्हा सगळ्या प्रकारच्या मुलांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास केला पाहिजे.