पुणे – ज्येष्ठ कलावंतांना सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मानधन देण्यात येते. हे मानधन संचालनालयापासून समाजकल्याण खात्यापर्यंत पोहोचण्यास उशीर होत असतो. त्यामुळे हे मानधन आता थेट ज्येष्ठ कलावंतांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक मनोज सानप यांनी दिली.
ऑनलाईन मिळणार ज्येष्ठ कलावंतांचे मानधन
सानप म्हणाले, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ कलावंतांना दिले जाणारे मानधन हे संचालनालयाद्वारे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवले जाते. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून ते गटविकास अधिकार्याकडे वर्ग केले जाते. या प्रक्रियेत बराच कालावधी जातो व कलावंतांना मानधनासाठी वाट पाहावी लागते. मात्र, कलावंतांना मानधनासाठी आता खेटे घालण्याची गरज पडणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेला फाटा देत संचालनालयाने कलावंतांच्या खात्यातच ऑनलाईन पद्धतीने मानधन जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया मुंबईत सुरू झाली आहे, पुण्यातही या उपक्रमाची सुरुवात लवकरच केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर तो संपूर्ण राज्यात राबविला जाईल, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारकडून १९५४ पासून ज्येष्ठ कलावंतांना आधार देण्यासाठी मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार श्रेणी प्रमाणे चौदाशे, बाराशे आणि हजार रुपये असे मानधन दर महिन्याला दिले जाते. दरम्यान, राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर २०१३ व जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०१४ या पाच महिन्यांचे मानधन कलावंतांना एप्रिल महिन्यात तब्बल पाच महिन्यांनी उशिरा मिळाल्याचा प्रकार घडला होता. पुणे जिल्ह्यात जवळपास एक हजार ५६४ ज्येष्ठ कलावंतांना राज्य सरकारकडून मानधन दिले जाते. त्यामध्ये पुणे शहरात राहणार्या कलावंतांची संख्या सर्वाधिक आहे.