दिल्ली – चांगली वर्तणूक असलेले कैदी आणि त्यांची शैक्षणिक पात्रता विचारात घेऊन इंडियन बँकेने तुरूंगातील शाखात तुरूंगातील कैद्यांनाच नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे असे बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी.एम. भसीन यांनी सांगितले. याची सुरवात दिल्लीतील तिहार तुरूंगापासून करण्यात येत आहे.
इंडियन बँक देणार तिहारवासियांना नोकरी
इंडियन बँकेची तिहार तुरूंगात अनेक वर्षे शाखा आहे आणि या शाखेची उलाढाल १०० कोटींची आहे. तिहार जेल इनमेटना शाखेत नोकरी देण्याचा प्रस्ताव बँकेने मंजूर केला आहे आणि बँकेतील संवेदनशील नसलेल्या जागांवर ही नोकरभरती केली जाणार आहे. तुरूंगाचे प्रवक्ते सुनील गुप्ता म्हणाले की शिपाई, सुरक्षा रक्षक तसेच संगणक ऑपरेटर अशी पदे कैद्यांना दिली जाणार आहेत. ज्यांची वर्तणूक चांगली आहे आणि जे कैदी शारिरीक तसेच मानसिक दृष्ट्या फिट आहेत, त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जाणार आहे.
यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागात व तुरूंगातील कारखाने उभारणीत कैद्यांना नोकरी दिली गेली आहे. वेदांता ग्रुप व आयडीइएम इंडियानेही आत्तापर्यंत सर्वाधिक कैद्यांना रोजगार दिला आहे. ताजमहाल ग्रुपने राजु पारसनाथ या कैद्याला नुकतेच दरमहिना ३५ हजार रूपयांचे पॅकेज देऊन नोकरी दिली आहे.