अखेर कॅम्पाकोलावर महापालिकेचा हातोडा

campa-cola
मुंबई – महापालिकेच्या पथकाला कारवाई करण्यापासून गेल्या तीन दिवसांपासून रोखणा-या कॅम्पा कोलाच्या रहिवाशांचा विरोध अखेर मावळला असून, सोमवार सकाळपासून कॅम्पाकोलामधील अनधिकृत घरांवर कारवाई सुरु झाली आहे.

पाणी, गॅस आणि वीज जोडणी कारवाईच्या पहिल्या टप्प्यात तोडण्यात येणार आहे. रविवारी दुपारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांबरोबर रहिवाशांची चर्चा झाली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून काही सकारात्मक आश्वासने मिळाल्याने रहिवाशांचा विरोधाचा सूर मावळला. त्यांनी पालिकेच्या पथकाला कारवाईमध्ये पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

आज सकाळी पालिकेची पथके दाखल झाल्यानंतर रहिवाशांनी पुन्हा एकदा प्रवेशव्दारावरच पालिकेच्या अधिका-यांकडून काय कारवाई करणार ते समजून घेतले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यापासून पालिकेला रोखणा-या रहिवाशांना पालिकेने रविवारी अंतिम इशारा दिला होता. अखेर रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर रहिवाशांनी विरोध न करण्याचा निर्णय घेतला.

शुक्रवारी कॅम्पाकोला कम्पाउंडमधील अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला रहिवाशांनी प्रवेशव्दारावरच रोखून धरले होते. त्यानंतर पालिकेने शनिवारी विरोध करणा-या रहिवाशां विरोधात वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave a Comment