मुक्ता दाभोलकरांचे खडेबोल;खरंच आत्मीयता असेल, तर मारेकरी पकडा

mukta
पुणे – राज्यकर्त्यांना डॉक्टर दाभोलकरांच्या कार्याबद्दल खरंच आत्मीयता असेल, तर पुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि डॉक्टरांच्या मारेकऱ्यांना त्वरीत पकडावे असे खडेबोल मुक्ता दाभोलकर यांनी उपमुख्यमंत्र्याच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांना पर्यायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच सुनावले.

महापालिकेतर्फे दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉक्टर दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

हा पुरस्कार स्विकारताना मुक्ता दाभोलकरांनी, पुण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता तसेच दाभोलकरांचे मारेकरी अद्यापही सापडले नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पुरस्काराच्या रुपाने मिळालेले एक लाख रुपये आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी द्यायला तयार आहोत. मात्र तसे केले तर ही कृती केवळ सनसनाटी कृत्य ठरेल, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली .पुणे शहरात जंगली महाराज रस्त्यावर झालेला बाँबस्फोट आणि डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या अनेक घोषणा करण्यात आल्या मात्र अद्यापही पुणे महापालिका प्रशासन सीसीटीव्ही कॅमेरे बसवू शकलेले नाही.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी टेंडर प्रोसेसमुळे सीसीटीव्ही बसण्यास वेळ लागत असल्याचे स्पष्टीकरण दिले .

Leave a Comment