दोन संताच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी जनसागर उसळला

palkhi
पुणे – ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत ठिकठिकाणी अन्नदान करून पुण्यनगरीत माऊलींच्या पालखीचे स्वागत जोरदार स्वागत करण्यात आले. वारकर्‍यांच्या खांद्यावरील भगव्या पताका आणि टाळमृदंगाच्या गजराने विद्येच्या माहेरघऱ म्हणून ओळखली जाणारी अवघी पुण्यनगरी माऊलीमय झाली.

ज्ञानेश्वर माऊलीच्या गजरात पुण्यनगरीने भाविक व पालख्यांचे स्वागत केले. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम या दोन संताच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी अवघा जनसागर उसळला होता. दोन संतांच्या पालख्यामधील लाखो वारकर्‍यांच्या अलोट गर्दीने जणूकाही संतांचा मेळाच भरल्याचे चित्र पुण्यात होते. शहरात ठिकठिकाणी अभंग फुगडी, खेळ आणि अखंड हरिनामाचा गजर अशा भावपूर्ण वातावरणात आसमंत फूलून गेला होता.

पालखीच्या दर्शनासाठी महिला व पुरूष अशा स्वतंत्र रांगा होत्या. लाखो वारकर्‍यांच्या गर्दीने संपूर्ण शहर ज्ञानोबा तुकारामचा गजर करत होते. संपूर्ण पुण्यात ठिकठिकाणी भजन, किर्तन, अखंड चालणारी अंभगवाणी आणि दर्शनासाठीच्या रांगा यामुळे आज जणू काही भक्तीसागरच उसळला होता. दरम्यान, आज पहाटे माउलींच्या पादुकांची पुजा पालखी सोहळा प्रमुख डॉ.शिवाजीराव मोहिते यांनी केली. त्यानंतर दर्शन चालू करण्यात आले. दिवसभरात हजारो भाविक पुणेकरांनी दर्शनासाठी गर्दी केली.

आज दिवसभर स्वच्छ वातावरण होते. आकाशात अधूनमधुन ढग जमा होत होते. परंतू कोठेही पावसाचा मागमोस जाणवत नव्हता. वारकर्‍यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी फिरते दवाखाने उपलब्ध केले होते. चहा अल्पोपोहराची सोय, वारकर्‍यांसाठी शहवासिय, विविध मंडळे, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या कार्यकत्यांनी अन्नदान, मोफत आरोग्य शिबिरे भरवून पुण्य पदरात पाडून घेतले. उद्या सकाळी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा दिवेघाट पार करून संत सोपानकाकांच्या सासवड ग्रामी 2 दिवसांच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.

Leave a Comment