वैष्णवांचा मेळा विसावला पुण्यात !

palkhi
एक गावे आम्ही ।
विठोबाचे नाम ॥
आणिकांचे काम ।
नाही आता ॥
या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे टाळ, मृदुंगाच्या साथीने विठ्ठल नामाचा गजर करीत ज्ञानोबा-तुकोबांसमवेत देहू, आळंदीतून निघालेला लाखो वैष्णवांचा दळभार सायंकाळी पुण्यनगरीत दाखल झाला. पुणेकरांनी आपल्या परंपरेला साजेल अशा उत्साही व भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
आज पहाटे गांधीवाड्यात गांधी परिवाराच्यावतीने माऊलींची पूजा करण्यात आली. पाच वाजता महापूजा करून सहा वाजता माऊलींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. पुढे माऊलीचा अश्‍व, मागे स्वाराचा अश्‍व, त्यानंतर मानाच्या 27 दिंड्या, त्यानंतर माऊलींचा रथ आणि रथामागे चालणारा 250 दिंड्यांचा ताफा असा लवाजमा घेवून माऊली पंढरीच्या दिशेने निघाल्या. सोबतीला लाखो भाविकांचा ताफा.
सकाळी 9 वाजता हा सोहळा थोरल्या पादुका मंदिराजवळ पोहोचला. त्यावेळी रथातून पालखी उतरविण्यात आली व आरतीसाठी थोरल्या पादुका मंदिरात नेण्यात आली. आरतीनंतर हा सोहळा पुढे मार्गस्थ झाला. सकाळी 10 वाजता पालखी सोहळा भोसरी फाट्याजवळ पोहोचला. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपिालिकेच्यावतीने महापौर सौ.मोहिनी लांडे, आ.विलास लांडे, आयुक्त राजीव जाधव यांच्यासह नगरसेवक व माऊली भयतांनी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिंडी प्रमुखांना संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपानदेव, संत चांगदेव व संत मुयताई यांच्या समुहशिल्पाची प्रतिकृती भेट दिली. येथे सोहळ्याने सकाळचा विसावा घेतला. पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळे सुमारे अर्धा तास सोहळा जागेवरच थांबला. सकाळी 10.30 वाजता सकाळची न्याहरी व विश्रांती घेवून सोहळा दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी मार्गस्थ झाला. सकाळच्या न्याहरीनंतर सोहळा 11.30 वाजता दिघी येथे पोहोचला. तेथे नगरसेवक चंद्रकांत वाळके, माजी सैनिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ए.एस.भिसे यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. येथे वारकर्‍यांना अन्नदान करण्यात आले. कळस, विश्रांतवाडी येथील स्वागत स्विकारून सोहळा दुपारी दीड वाजता फुलेनगर येथे पोहोचला. आळंदी ते पुणे या पालखी प्रवासात पुणेकरांनी सोहळ्यात सहभागी होवून सोहळ्याचा आनंद लुटला. जवळपास दीड ते दोन लाख भाविक सहभागी झाल्याने पालखी मार्गावर भक्तीचा महापूर आला होता. दुपारचा नैवेद्य आणि विसाव्यासाठी सोहळा फुलेनगर येथील दत्तमंदिरात पोहोचला. दुपारच्या भोजन व विश्रांतीनंतर हा सोहळा पुण्यनगरीकडे दुपारी 3 वाजता मार्गस्थ झाला. दिवसभर कधी ढगाळ वातावरण तर कधी निरभ्र आकाश यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे वारकर्‍यांना चालताना त्रास होत होता. सायंकाळी 4 वाजता हा सोहळा संगमवाडी पुलावर पोहोचला. संगमवाडी ग्रामस्थांनी माऊलींसह वैष्णवांचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. विश्रांतीनंतर हा सोहळा पुढे मार्गस्थ झाला. सकाळी आकुर्डीवरून निघालेला जगत्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सायंकाळी 5 वाजता पुण्यनगरीत दाखल झाला. त्यानंतर श्री ज्ञानेश्‍वर माऊलींचाही पालखी सोहळा पुण्यनगरीत दाखल झाला. या दोन्ही पालखी सोहळ्याचे महापौर चंचला कोद्रे, आयुक्त विकास देशमुख, खा.अनिल शिरोळे, सहआयुयत ज्ञानेश्‍वर मोळक, आ.अनिल भोसले, आ.विनायक निम्हण, माजी आ.रामभाऊ मोजे यांच्यासह नगरसेवक व पुणेकरांनी प्रेमहर्षाने स्वागत केले. पुणे येथील स्वागत स्विकारून सोहळा पुण्यनगरीतील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन, अलका टॉकीज चौक, लक्ष्मी रोड, गणपती चौक, सिटी पोस्ट मार्गे भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा तर श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा नाना पेठ विठोबा मंदिरात रात्री उशीरा पोहोचला. माऊली व तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे येथे दोन दिवस मुक्काम आहेत.

Leave a Comment