चव्हाणांनी मारली बाजी

chavan
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलून त्याजागी नवा मुख्यमंत्री नेमण्याच्या चर्चा जोरात सुरू होत्या. याबाबत खुद्द चव्हाणांनाच विचारले तेव्हा त्यांनी हसण्यावारी नेले. आपण जेव्हापासून मुख्यमंत्री झालो तेव्हापासून या चर्चा सुरू आहेत तेव्हा त्यात नवीन काही नाही. आपल्याला बदलले जाणार असेल तर आपल्याला काही माहीत नाही. पक्षश्रेष्ठींनी आपल्याला अद्याप काही कळवलेले नाही. असे उत्तर त्यांनी दिले आणि ते बरोबर आहे. कारण नेतृत्व बदलाची चर्चा करत राहणे हा काही दैनिकांचा आणि माध्यमांचा धंदाच झाला आहे. त्यांच्याकडे कोणी गांभिर्याने पाहत नाही. परंतु यावेळी तसे पाहिले गेले होते कारण नव्या नेतृत्वबदलाच्या हालचाली लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झाल्या होत्या. कॉंग्रेस पक्षाचा या निवडणुकीत एवढा दारूण पराभव झाला आहे की, पक्षाचे सारे कार्यकर्ते निराश झाले आहेत. त्यांचा उत्साह टिकवायचा असेल आणि त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करायचा असेल तर पराभवानंतर आपण काहीतरी केले आहे हे त्यांना दाखवणे आवश्यक आहे. म्हणून आसाम, महाराष्ट्र, हरियाणा या तीन राज्यात नेतृत्वबदल करण्यात येणार असे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले होते. म्हणून महाराष्ट्रात नेतृत्वबदल होणार या बातम्यांवर लोकांचा विश्‍वास बसला.

कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींना खरोखरच काय करावे हे समजत नाही. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याने नेमके काय साध्य होणार आहे याबाबतही पक्षश्रेष्ठी अंधारातच आहेत. म्हणून शेवटी मुख्यमंत्री दिल्लीला गेले तेव्हा नेतृत्वबदलाच्या चर्चा संपल्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींच्या गळी काय उतरवले हे माहीत नाही. पण त्यांनी त्यांना बदलण्याचा बेत बदलायला लावला. कॉंग्रेस पक्षाचा पराभव भ्रष्टाचारामुळे झालेला आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर आपल्या सारख्या भ्रष्टाचारापासून दूर असलेल्या मुख्यमंत्र्याला हलवून चालणार नाही. हे त्यांनी दाखवून दिले असेल. एकंदरीत पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारली आहे. खरे म्हणजे खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनीच नेतृत्वबदलाची शक्यता सुरूवातीपासूनच फेटाळली होती. ते काल दिल्लीत गेले आणि त्यांनी अनपेक्षितपणे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचीही भेट घेतली. ती का घेतली हे काही कळले नाही. काही जुने संदर्भ असावेत. पण त्यांची मनमोहनसिंग यांच्याशी झालेली भेट ही मोठीच बातमी ठरली. कारण कॉंग्रेस पक्षाने या माजी पंतप्रधानांना पूर्णपणे दुर्लक्षित केलेले आहे. निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा त्यांना कुठेच उतरवले नाही. पण पृथ्वीराज चव्हाण त्यांना भेटले आणि नंतर नेतृत्वबदल होणार नाही असे जाहीर झाले.
पृथ्वीराज चव्हाण यांना हटवलेच असते तर त्यांच्या जागी सुशीलकुमार शिंदे यांना नेमले जाणार होते आणि या नेतृत्व बदलामध्ये कॉंग्रेसपेक्षाही शरद पवार अधिक कार्यरत झाले होते. सुशीलकुमार शिंदे यांच्या व्यतिरिक्त नारायण राणे यांच्यासह काही नावे चर्चेत होती. आता ही नावे चर्चेत होती म्हणजे नेमके काय, हेही स्पष्ट होत नाही. परंतु या कोणाहीपेक्षा सुशीलकुमार शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे असा शरद पवार यांचा आग्रह होता. नारायण राणे एकदा मुख्यमंत्री झालेले आहेत. तेव्हा या पदाला पात्र नव्हते असे काही म्हणता येत नाही. पण शरद पवार शिंदे यांच्या बाबतीतच एवढे का आग्रही होते हे सामान्य माणसाला कळत नाही. लोक आपले वरवरचे निष्कर्ष काढतात. ते फार जुने मित्र आहेत, शिंदे पवारांचे शिष्यच आहेत अशी काही तरी संगती लावत बसतात. पण पवारांचा हेतू वेगळाच असतो. या सगळ्या चर्चेत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. ए.के. अँटनी हे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. त्यांच्याशी बोलताना शरद पवार यांनी नेतृत्व बदल करावा अशी सूचना केली. त्यावेळी अँटनी यांनी पवारांना एक पेच टाकला. कॉंग्रेस पक्ष नेतृत्व बदल करून पृथ्वीराज चव्हाण यांच्याऐवजी दुसरा मुख्यमंत्री नेमायला तयार आहे पण त्याच वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस उपमुख्यमंत्री बदलायला तयार आहे का, असा प्रश्‍न अँटनी यांनी पवारांना विचारला.

श्री. पवार यांनी या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थी दिले. उपमुख्यमंत्री बदलणे किंवा न बदलणे हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्‍न आहे असे उत्तर दिले. त्यावर श्री. अँटनी यांनी मुख्यमंत्री बदलणे हा कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्‍न आहे, त्यात तुम्ही लक्ष घालू नका असे म्हणत पवारांना गप्प बसवले. पवार गप्प बसल्यास नेतृत्व बदलाची चर्चाच संपली. कारण या सगळ्या राजकारणात जे लोक नेतृत्व बदलाचा प्रयत्न करत होते ते तो प्रयत्न स्वत:च्या ताकदीवर करत नव्हते, तर पवारांच्या वशिल्याने करत होते. सोनिया गांधींजवळ पवारांचे वजन आहे, त्यामुळे त्यांनीच सोनिया गांधींना नेतृत्व बदलाचे महत्व पटवून द्यावे असा त्यांचा प्रयत्न होता. पृथ्वीराज चव्हाण हे वेगाने काम करणारे मुख्यमंत्री नाहीत म्हणून त्यांना बदलावे ही कल्पना शरद पवार कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींच्या गळी उतरवत होते आणि आज नव्हे तर कित्येक दिवसांपासून ते पृथ्वीराज चव्हाण यांची तशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. तसाच प्रयत्न करून ते आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळवून देतील अशीही राज्यातल्या इच्छुकांची कल्पना होती. पवारांना सुद्धा हा नेतृत्व बदल हवाच होता. पण तो बदल त्यांच्या फायद्याच्या दृष्टीने व्हावा अशी त्यांची धडपड होती. पण त्या सर्वांवर पृथ्वीराज चव्हाण यांनी मात केली. पवारांना सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री हवे होते, कारण कॉंग्रेसने दलित समाजाचा मुख्यमंत्री केला की, मराठा समाज कॉंग्रेसवर नाराज होईल आणि त्या नाराजीपोटी तो राष्ट्रवादीच्या मागे उभा राहील अशी त्यांची कल्पना होती. परंतु कॉंग्रेसश्रेष्ठींनी त्यांना धूप घातला नाही.

Leave a Comment