पालकमंत्र्यांच्या समोर आघाडीच्या नेत्याला जबर मारहाण

patangrao-kadam
सोलापूर – पलूसच्या आमसभेत वनमंत्री पतंगराव कदम यांच्या समक्ष काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटना युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संदीप राजोबा गंभीर जखमी झाले असून, त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी, वनमंत्री पतंगराव कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागणी करीत केली आहे.

२००८ नंतर पहिल्यांदाच आज पलुस येथे पंचायत समितीची आमसभा भरलेली होती. या आम सभेला राज्याचे वनमंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पतंगराव कदम हे देखील उपस्थित होते. सभेला सुरवात झाल्यानंतर २०१४ च्या सभेचे वाचन गट विकास अधिकारी आडसुळ यांनी सुरु केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पंचायत समिती सदस्य यांनी मागील सभेच्या ठरावांबद्दल काय झालं? व उस दराबद्दल पालकमंत्रांनी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? अशा प्रश्नांच्या फैरी झाडत पालकमंत्र्यांना फैलावर घेतले. त्याचा राग मनात धरून कदम समर्थक कार्यकर्ते व जि.प.सदस्य हेमंत पाटिल, मोहन तावदर (भिलवडी), विक्रम (आप्पा) पाटील, विजय आरबुने, सचिन आवटी यांनी व्यासपीठावरच राजोबा यांना तु जास्त बोलतोस असे म्हणत हल्ला चढवला आणि मारहाणीला सुरवात केली.यावेळी पोलिसांनीही फक्त बघ्याची भुमिका घेतल्याचा आरोप स्वाभिमानीच्या नेत्यांनी केला आहे. या हल्ल्यात संदीप राजोबा गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी,वनमंत्री पतंगराव कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वनमंत्री पतंगराव कदम यांच्या सांगलीतील निवासस्थानावर मोर्चा काढून दगडफेकही केली. यावेळी सांगलीत स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी पतंगराव कदम यांच्या बंगल्यासमोर ठिय्या मारल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

Leave a Comment