महाराष्ट्रात फक्त प्रचारच करणार ;शरद पवार

sharad-pawar
मुंबई – राज्यात नेतृत्वबदलाचे वारे वाहत असतानाच माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा महाराष्ट्रात येण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि ए. के. अँण्टोनी यांनी आपल्याबरोबर झालेल्या चर्चेत महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. मात्र, आपण महाराष्ट्रात फक्त प्रचाराचेच काम करणार असल्याचे त्यांना सांगितले, असे पवार यांनी पत्रकारांना स्पष्ट केले.

पवार म्हणाले ,महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लढताना काही ठिकाणी काँग्रेसबरोबरची आघाडी आम्हाला त्रासदायक ठरणार आहे. वेगवेगळे लढलो तर तेथे फायदा होईल, अशी स्थिती आहे. तरीही आम्ही आघाडी करूनच निवडणुकांना सामोरे जाणार असेही त्यांनी सांगितले. येणारी विधानसभा निवडणूक नेहमीसारखी नाही. लोकसभेसाठी जनतेने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने पर्याय शोधला. मोदी लाट दुर्लक्षून चालणार नाही, असेही ते म्हणाले.केंद्रात सरकार बदलले असल्याने राज्यपाल बदलणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात अन्नधान्याचे उत्पादन भरपूर आहे. त्याचे योग्य वाटप झाले पाहिजे. राज्यातील एलबीटी रद्द केला जाण्याची गरज आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

Leave a Comment