मराठा आरक्षणाला विरोध नाही; पण ओबीसींना धक्का नको -भुजबळ

chggan-bhujbal
मुंबई – मराठा आरक्षणाला माझा कधीच विरोध नव्हता. आजही नाही. फक्त हे आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. त्यांच्या हक्काचं संरक्षण झाले पाहिजे. कारण देशात आणि राज्यात ५४ टक्के ओबीसी आहेत. ओबीसी प्रवर्गात महाराष्ट्रातील सुमारे ३७0 जाती साळी, माळी, कोळी, धनगर, वंजारी, तेली, कुंभार, सुतार आणि विजे आदी येतात. मी जी भूमिका मांडली, तीच भूमिका राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस पक्षाचीही आहे, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून भुजबळ यांनी नेटिझन्सशी दोन तास संवाद साधला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून सुमारे ४0 हजार फेसबुक यूझर्स या चॅटमध्ये सहभागी झाले होते. जवळ जवळ एक हजार कमेंट्स आल्या. त्यातल्या २00 कमेंट्सना भुजबळांनी सर्मपक उत्तरे दिली. तसेच २00च्या वर कमेंट्स लाइकही केल्या. मराठा आरक्षणाविषयी होणार्‍या टीकेलाही भुजबळ यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले की, मंत्रिमंडळात मी कधीच मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही; पण काही राजकारणी मंडळींनी आपले राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी मी मराठा आरक्षण विरोधी आहे, असा खोटा प्रचार केला आणि करत आहेत. निश्‍चितच काही दिवसांमध्ये मराठा आरक्षण योग्य त्या कायदेशीर बाबीत बसवून जाहीर केलं जाईल, याची मला खात्री आहे.’ मराठा समाजातील गरीब जनतेविषयी मला नितांत आदर आणि कणव आहे, त्यांना आरक्षण मिळायला हवं, ही भूमिका अनेक वर्षांपासून मांडत असल्याची भावनाही त्यांनी काही तरुणांना कमेंट्स करताना व्यक्त केली.