पाकचा पुन्हा तालिबान्यांच्या गुप्त अड्ड्यांवर हवाई हल्ला

pakistan
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या लष्कराने तालिबान्यांवर प्रहार करण्याचे सत्र सुरूच ठेवताना आज पुन्हा एकदा देशाच्या वायव्य सरहद्दीतील उत्तर वझीरिस्तानात असलेल्या तालिबान्यांच्या गुप्त अड्ड्यांवर जोरदार हवाई हल्ला केला. यात किमान ३० तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत. एक महिन्याच्या काळात पाकने केलेला हा पाचवा हवाई हल्ला असून, यात आतापर्यंत २६० दहशतवादी मारले गेले आहेत.

आज पहाटे पाचच्या सुमारासच पाकने या भागात हवाई हल्ले सुरू केले. हस्सू खेल भागात असलेले तालिबान्यांचे तीन अड्डे यात पूर्णपणे नष्ट झाले. या हल्ल्यात २० दहशतवादी ठार झाले. यानंतर खैबर प्रांतातील दोन अड्ड्यांवर हवाई हल्ले करण्यात आले. यात १० दहशतवादी ठार झाले. पाकच्या लष्कराने तालिबान्यांवर हल्ले करण्यासाठी आजही जेट लढाऊ विमानांचाच वापर केला.

याच महिन्याच्या सुरुवातीला पाकच्या लष्कराने तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानी या जहाल दहशतवादी संघटनेविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली. त्यानंतर तालिबान्यांनी कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आत्मघाती हल्ला केला आणि पाकने ही मोहीम अधिकच तीव्र केली. या अल्पावधीत झालेला हा पाचवा हवाई हल्ला असून, यात आतापर्यंत २६० पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये बहुतांश अतिरेकी विदेशी आहेत.

Leave a Comment