आयएसआयएसचा इराकच्या सीमावर्ती भागावर ताबा

iraq
बगदाद – इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅन्ड सीरिया (आयएसआयएस) ही दहशतवादी संघटना इराकच्या सरकारी फौजांचा पाडाव करुन हळूहळू पुढे सरकत चालली आहे. सीरीयाला लागून असणा-या इराकच्या सीमावर्ती भागावर आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी ताबा मिळवला आहे.

या भागावर ताबा मिळवण्यापूर्वी सुन्नी दहशतवादी आणि इराकी फौजांमध्ये जोरदार चकमक झाली. मात्र इराकी फौजेचा पाडाव करुन, आयएसआयएसने या भागावर ताबा मिळवला. या चकमकीत इराकचे तीस जवान शहीद झाले. पंतप्रधान नूरी अल मलिकी यांच्या सरकारसाठी हा एक धक्का आहे.

मोसुलसह उत्तर इराकमधील अनेक भागांवर या दहशतवादी संघटनेने ताबा मिळवला आहे. मोसुल हे इराकमधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. आयएसआयएसचे दहशतवादी बगदादपासून ३२० किलोमीटर अंतरावर आहेत. सीमावर्ती भागावर नियंत्रण मिळवल्यामुळे आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना सहजतेने शस्त्रास्त्रांची ने-आण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment