‘हायकमांड’च्या निर्णयानुसार काम करणार; मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

prithviraj-chavan
पुणे – राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबतच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच अप्रत्यक्ष होकार दर्शवला असून पक्षनेतृत्वाचा निर्णय अंतिम असून तो आपल्याला पूर्णपणे मान्य असेल, असे स्पष्टीकरण दिले आहे. ते पुण्यात बोलत होते.

लोकसभा निवडणुकीनंतर मित्रपक्ष राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षातूनही पृथ्वीराजांच्या विरोधात आघाडी उघडण्यात आली होती. मुख्यमंत्री बदलण्याची जाहीर मागणीही करण्यात आली होती. आता नव्या चेहऱ्यांची नावेही समोर येत आहेत. त्यामुळे बदलाच्या चर्चेला अधिकच रंग चढला आहे.

याबाबत पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता त्यांनी प्रथमच थेट प्रतिक्रिया देताना ‘मुख्यमंत्री बदलाची चर्चा वर्तमानपत्रांमध्ये भरपूर आहे हे खरे आहे. मात्र, माझ्यापर्यंत अद्याप तरी कोणताही संदेश आलेला नाही. तसा काही निर्णय झालाच तर योग्य वेळी तो तुम्हाला कळेल; पण पक्षनेतृत्व जी जबाबदारी सोपवेल ती स्वीकारण्यास आपण तयार आहोत. पक्षाने संघटनेची जबाबदारी सोपवल्यास पुन्हा दिल्लीत जाऊन काम करु, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच हायकमांडचा निर्णय योग्य वेळी समोर येईलच, तोपर्यंत राज्याचा प्रमुख या नात्याने पूर्ण निष्ठेने काम करत राहणार असेही ते म्हणाले.

Leave a Comment