श्रीमंत देशातले गरीब शेतकरी

farmer2
काही प्रगत देशातले आणि भारतातले कृषि उत्पादनाचे आकडे यांचा आपण तुलनात्मक विचार केला तर काय दिसते? इस्रायलसारखा छोटा देश वालुकामय असूनही शेतीमध्ये आपल्यापेक्षा जास्त उत्पादन काढतो. आपण त्याचा अभ्यास केला तर आपली प्रगती कोठे थांबली आहे आणि का थांबली आहे याची कल्पना येईल. इस्रायल देश केवढा आहे ? तो महाराष्ट्राएवढा सुद्धा नाही. महाराष्ट्रातले कोणतेही ३ जिल्हे एकत्र केल्यावर जेवढे क्षेत्रङ्गळ होईल तेवढे या देशाचे क्षेत्रङ्गळ आहे. पण भारतासारख्या शेती प्रधान देशानेही आदर्श ठेवावा असे अनेक यशस्वी प्रयोग या देशातल्या शेतकर्‍यांनी केले आहेत. तिथे पाण्याची मोठी टंचाई आहे. पाऊस पडतो तो कधी तरी पण तिथला शेतकरी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा विचार करतो. आभाळातून पडणारा प्रत्येक थेंब आपल्या शेतीच्या कामालालागला पाहिजे असा त्याचा प्रयत्न असतो. आपण असा प्रयत्न करीत नाही. कित्येक कोटी लिटर पाणी वाया घालवतो. जमीन आणि पाणी हे शेतीचे दोन मुख्य घटक आहेत. त्यांचा अत्यंत बारकाईने विचार केला तरच भारतीय शेतकर्‍यांची गरिबीतून सुटका होणार आहे.

भारताविषयी जगातले लोक काय म्हणतात हे माहीत आहे का ? लोक म्हणतात, ‘भारत हा श्रीमंत देश आहे पण त्यात गरीब लोक राहतात.’ या म्हणण्याचा हेतू काय असतो ? भारत देश श्रीमंत आहे म्हणजे या देशाला निसर्गाचे वरदान चांगले लाभले आहे. सुपीक जमीन दिली आहे. या देशाच्या तीन बाजूंना समुद्र आहे. एका बाजूला भव्य हिमालय पर्वत आहे. अशी समृद्धी लाभलेला अन्य एकही देश या जगात नाही. देश उष्ण कटिबंधात असल्याने समुद्राच्या पाण्याची वाङ्ग होऊन जून ते ऑक्टोबर असे चार महिने पाऊस पडतो. भारताला पावसाळा नावाचा ऋतू आहे. तसा तो ङ्गार कमी देशात आहे. जगात इतर देशात उन्हाळा आणि हिवाळा असे दोनच ऋतू आहेत आणि त्यात मधून मधून पाऊस पडत असतो. आपल्या देशात मात्र ठराविक चार महिने पाऊस पडतो.

कधी कधी अवकाळी पाऊस पडून जातो आणि आपण त्रस्त होतो. पण जगातल्या इतर देशात सतत अवकाळीच पाऊस असतो. त्यांच्या मानाने आपण सुखी आहोत. भारतात अति थंड हवामानापासून अति उष्ण हवामानापर्यंत सगळ्या प्रकारचे हवामान आहे. हिमालय पर्वताच्या कुशीतली राज्ये थंड आहेत तर राजस्थानमध्ये अती उष्णता आहे. त्यामुळे या देशात सगळ्या प्रकारची पिके घेता येतात. हे वरदान ङ्गार दुर्मिळ आहे. अशी सारी अनुकूल स्थिती असल्यामुळे भारत हा श्रीमंत ठरलेला देश आहे. पण या देशात गरीब लोक राहतात. कारण ते या निसर्गाने दिलेल्या श्रीमंतीचा ङ्गायदा करून घेत नाहीत. एकरी २० क्विंटल धान्योत्पादन करता येईल अशी समृद्धी आहे, पण आपण एकरी ८ क्विंटल धान्य उत्पादन करीत बसलो आहोत.

एखाद्या श्रीमंत बापाने आपल्या मुलासाठी अमाप संपत्तीचा वारसा ठेवलेला असावा पण त्या कर्मदरिद्री मुलाने त्या संपत्तीवर बसून, ‘आता माझे कसे होईल’ म्हणून रडत रहावे तशी आपली स्थिती झाली आहे. म्हणूनच सारे जग आपली संभावना श्रीमंत देशातले गरीब शेतकरी अशा शब्दात करीत आहे. इतर श्रीमंत देशातले शेतकरी काय करीत असतात याची नीट माहिती करून घेतली तरच आपण ‘श्रीमंत देशातले श्रीमंत शेतकरी’ होणार आहोत. महाराष्ट्रातले बरेच शेतकरी इस्रायलची शेती बघायला त्या देशाचा दौरा करून आले आहेत. तिथल्या शेतीचा त्यांनी बारकाईने अभ्यासही केला आहे. तिथला शेतकरी थेंब थेंब पाणी कसे कसोशीने वापरत असतो हे पाहिले आहे. त्यांनी आपल्या आणि त्यांच्या पाणी वापराच्या पद्धतींचा तुलनात्मक अभ्यासही केला आहे. असेच एक प्रगतिशील शेतकरी इस्रायलला जाऊन आले आणि त्यांनी तिथल्या अभ्यासाचा निष्कर्ष काढताना म्हटले, ‘इस्रायलच्या पद्धतीने आपण पाणी वापरायला शिकलो तर एकट्या उजनी धरणाच्या पाण्यावर पूर्ण महाराष्ट्राची शेती बागायत होईल.’ या म्हणण्यात काही लोकांना अतिशयोक्ती वाटेल पण आपले पाणी वापरणे म्हणजे पाण्याची नासाडी असते.

आपण एक गोष्ट तरी नक्कीच मान्य करू की, आपण शेतीला पाणी वापरताना पाण्याची भरपूर नासाडी करीत असतो आणि त्या वापरात काही काटकसर करण्याचा विचार केला तर आपण सध्या जेवढी जमीन बागायत करतो त्यापेक्षा जास्त जमीन बागायत होऊ शकते. पाण्याच्या वापराचा काही तरी हिशेब लावण्याची गरज आहे हे कोणीच नाकारत नाही. जी संकल्पना सध्या वॉटर ऑडिट म्हणून जाणली जात आहे. ऑडिट म्हणजे काय ? सरकारी खात्यात ऑडिट होत असते. सरकारने एखाद्या खात्याला दिलेला पैसा कसा खर्च झाला आहे, याची ती तपासणी असते. तसे आपण पाण्याचे ऑडिट करायला लागलो तर आपल्यालाही पाणी किती खर्च केले आणि त्यातून किती उत्पन्न काढले याचा पडताळा घेता येईल. तसा तो आपण घ्यायला गेलो तर आपण किती पाणी वाया घालवत असतो याचा बोध होईल.

तसे तर आपल्याला शेतीत वापरात येणार्‍या प्रत्येक गोष्टीचे ऑडिट केले पाहिजे. आपली माती, आपले पाणी, आपले बी, आपले श्रम आणि आपले पैसे या सार्‍यांचा आपण हिशेब मांडला पाहिजे. काही जण या सार्‍यांचा हिशेब मांडतही असतात आणि त्यांचे ऑडिट करतही असतात पण आपण एका गोष्टीचे ऑडिट करायला मात्र तयार होणार नाही ती गोष्ट म्हणजे आपल्या क्षमता. क्षमता म्हणजे आपले डोके, कल्पकता आणि आपले व्यवस्थापन कौशल्य. आता हे शब्द थोडे अवघड वाटतील पण शेतीतले उत्पन्न बरेचसे या गोष्टींवरच अवलंबून असते. सारे काही आहे पण शेतीचे नीट नियोजन केले नाही. सारे काही आहे पण शेतीतले लहान सहान प्रश्‍न सोडवण्यासाठी डोकेच वापरले नाही तर शेती कधी यशस्वी होणार नाही. तेव्हा आपली हुशारीही ङ्गार आवश्यक आहे. तिचा आपण किती वापर करतो यालाही महत्त्व आहे.

आपल्या देशातले थोर अर्थतज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी गरिबीची व्याख्या करताना म्हटले आहे. आपल्या हातात असलेल्या साधनांचे गैर व्यवस्थापन म्हणजे गरिबी. याचा अर्थ नीट ध्यानात घ्या. आपल्या हातात अनेक साधने आहेत पण त्या साधनांपासून जास्तीत जास्त किती उत्पन्न काढू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे आणि तेवढे उत्पन्न काढण्याचा अट्टाहास केला पाहिजे. असा अट्टाहास हीच आपल्या शेतीच्या सुधारणेची सुरूवात ठरणार आहे. शेती करण्यासाठी आपल्याला जी साधनसामुग्री प्राप्त झाली आहे तिचा धंदेवाईकपणाने विचार आणि नियोजन करणे हीच बाब आपल्याला उत्कर्षाला नेणार आहे. त्यालाच व्यावसायिकता असे म्हणतात. आपल्या देशातले बहुसंख्य शेतकरी धंदेवाईक नाहीत. काही अपवाद सोडले तर सगळेच शेतकरी नाईलाज म्हणून शेती करतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका पाहणीत ४० टक्के शेतकरी दुसरे काही करता येत नाही आणि अनायासे आपल्या मालकीची जमीन आहे म्हणून निरुपायाने शेती करतात, असे आढळून आले होते. नाईलाजानंच शेती करायची म्हटल्यावर मग खर्च किती झाला आणि उत्पन्न किती झालं याचा हिशेब तरी कशाला करायचा ? त्यामुळे शेतकरी वर्ग हिशेबाच्या वह्याच ठेवत नाहीत. मग व्यवसाय कसा करणार?

१९९० च्या सुमारास भारतातल्या उद्योगांची स्थितीही अशीच होती. उद्योगांना कोणाशी स्पर्धा करायची नव्हती. त्यामुळे मालाचा दर्जा सांभाळावा, चांगला मालच पण कमीत कमी किंमतीत कसा देता येईल याचा विचार करावा, अशी काही धडपडच कारखानदार करीत नव्हते. मुक्त अर्थव्यवस्थेचा अंमल सुरू झाला आणि परदेशी कंपन्या भारतात आल्या. त्यावर मात्र भारतीय उद्योजकांची धावपळ सुरू झाली. त्यांना या परदेशी कंपन्यांंशी आपली तुलना होणार याची जाणीव झाली. आपली गुणवत्ता सुधारली नाही तर आपण मरणार हे लक्षात यायला लागले. जगण्यासाठी तरी का होईना व्यावसायिकता यायला लागली. मग टाटा इंडिका चांगली आणि स्वस्तात मिळाली आणि नॅनो कार तर केवळ १ लाखात मिळायला लागली. १९९० च्या सुमारास भारतीय उद्योगधंद्यात एक पाहणी करण्यात आली होती. आपल्या मालाचा दर्जा सुधारावा यासाठी तुम्ही काय करता, असा प्रश्‍न उद्योजकांना विचारण्यात आला होता. तसा प्रयत्न तर कोणी करीत नव्हतेच पण या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचीही तसदी कोणी घेतली नाही. शेवटी या पाहणीचा नाद सोडून देण्यात आला.

१९९० नंतर मात्र चित्र बदलले. भारतीय कारखानदार सुधारले. त्यांनी यूरोप खंडातले कारखाने चालवायला घेतले. सार्‍या जगात भारतीय उद्योजकांचा दबदबा निर्माण झाला. पूर्वी भारतीय उद्योगांची उत्पादन वाढ वर्षाला ४ टक्के सुद्धा नव्हती, ती आता १२ टक्क्यावर गेली आहे. उद्योगात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हायला लागली आहे. ही प्रगती करताना उद्योगांसमोर अनेक अडचणी उभ्या होत्या. पण ज्याला प्रगती केल्याशिवाय काही पर्यायच नाही, प्रगती केली नाही तर मरणार हे लक्षात येते तो स्वत:च समोरच्या अडचणी सोडवत जातो. अशा उद्योजकांनी त्या सोडवल्या आणि आज चांगले चित्र निर्माण झाले आहे. भारतीय उद्योगधंदे १९९० साली ज्या अवस्थेत होते त्याच अवस्थेत आज शेती उद्योग आहे. शेतीतली वार्षिक उत्पादन वाढ जेमतेम १ टक्काही नाही. उद्योगधंद्यात ती १२ टक्के आणि सेवा उद्योगात ती ३५ टक्के आहे. शेतकरी विचार करणार नसतील तर त्याची वाढ होणारच नाही. ती १ टक्काच राहणार आहे. अडचणी तर खूप आहेत.

लोड शेडिंग आहे, पैसे नाहीत, भाव नाही वगैरे. पण या अडचणींवर मात करता येईल. कारण जमीन आहे, पावसाचे ङ्गुकटचे पाणी आहे, वेळ आहे, कष्ट करण्याची क्षमता आहे. जे नाही त्याची खंत करीत न बसता, जे आहे त्याचा नीट वापर केला तर परिवर्तन होऊ शकते. आजवर ज्यांनी परिवर्तन घडवले त्यांनी हेच केले आहे. व्यावसायिकता म्हणजे दुसरे-तिसरे काही नाही. आपला वेळ नीट वापरायचे नियोजन केले तरी अडचणीचे धुके वितळेल. जपानच्या शेतकर्‍यांनी दुसरे तिसरे काही केलेले नाही. जपानमधील कृषी क्रांती शेतातल्याच वाया जाणार्‍या काही कचर्‍यातून झालेली आहे. आपल्याकडे काही कचर्‍यांची काय वाण आहे ? वाण आहे निश्‍चयाची.

Leave a Comment