नऊ महिन्याच्या उच्चांकावर कच्च्या तेलाच्या किंमती

refinary
हॉंगकॉंग – इराकी सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून इराकमधील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी धुमश्‍चक्री सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आज, शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किंमतीने मागील नऊ महिन्यांचा उच्चांक गाठला असून हे युद्ध असेच सुरू राहिले तर पुढील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव ११४.९४ डॉलर प्रतिबॅरल इतका नोंदविण्यात आला.

बगदादच्या उत्तरेला हजारो चौरस किलोमीटरच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बैजी तेल शुद्धीकरणाच्या प्रकल्पावर नियंत्रण मिळविण्यासाठी इराक प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. इराकमधील एकूण तेल उत्पादनापैकी एक चतुर्थांश तेलाचे उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पात दररोज ३,२०,००० बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन घेतले जाते.

Leave a Comment