रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे कॅम्पाकोलातून महापालिकेची माघार

campacola
मुंबई – महापालिकेचे पथक कॅम्पाकोलातील बेकायदेशीर घरांचे वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडण्यासाठी गेलेले असताना रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना माघारी परतावे लागले आहे. या बाबत वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ असे महापालिका अधिका-यांनी स्पष्ट केले.

गेल्या सहा महिन्यांपासून वरळीतील कॅम्पा कोला इमारतीतील १०२ बेकायदेशीर घरांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु होते. या बेकायदेशीर घरांवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जूनमध्ये कारवाई होणार हे स्पष्ट होते. तीन दिवसांपूर्वी इमारतीतील एका वृध्दाचे निधन झाल्याने कारवाई टळली होती. अखेरीस शुक्रवारी सकाळी महापालिकेचे पथक फौजफाटा घेउन कारवाई करण्यासाठी इमारतीच्या परिसरात दाखल झाले. रहिवाशांनी तब्बल दीड ते दोन तास महापालिकेच्या पथकाला इमारतीच्या प्रवेशद्वाराबाहेरच रोखून ठेवले. इमारतीत प्रवेशद्वाराजवळच होमहवन केले गेले. महापालिका अधिका-यांनी रहिवाशांशी चर्चा करुन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कारवाई झाली तरी चालेल पण मात्र बांधकाम पाडू देणार नाही अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली होती. अखेरीस रहिवाशांच्या तीव्र विरोधापुढे नमते घेत अधिका-यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला.

आम्ही रहिवाशांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची माहिती दिली. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आता पुढील निर्णय वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करुन घेतला जाईल असे या अधिका-यांनी सांगितले.

दरम्यान, कारवाईलाविरोध करण्यासाठी आरपीआय, शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते. निदर्शने करणा-या काही आरपीआय कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तर शिवसेना व भाजपने कॅम्पाकोलाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदार ठरवले आहे.

Leave a Comment