मुख्यमंत्रीपदाबाबत विचारच केलेला नाही- उद्धव ठाकरे

udhdhave3
मुंबई -शिवसैनिकांच्या भावना मी जाणू शकतो मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याबाबत मी अद्यापी कोणताही विचार केलेला नाही असे सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेच्या ४८ व्या वर्धापनदिनामिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव म्हणाले की चार महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. ही निवडणूक लढवायची की नाही याचाही निर्णय मी अद्यापी घेतलेला नाही तसेच मुख्यमंत्रीपदाचा विचारही अद्याप केलेला नाही. आजपर्यंत ठाकरे कुटुंबियातील कुणीच निवडणूक लढविलेली नाही. संजय राऊत यांनी उद्धवजीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असे सांगितले असले तरी ते खरे शिवसैनिक आहेत. त्यांच्या आणि सर्वच शिवसैनिकांच्या भावना मी समजू शकतो.

मुख्यमंत्रीपद कुणाकडे असावे याची चर्चा करण्याची ही वेळ नाही. तुमची घाई मला समजते पण मी अजिबात घाईत नाही असे सांगताना उद्धव म्हणाले की राज्यात आमची महायुती आहे. त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल आणि तो होताच प्रथम पत्रकारांना सांगितला जाईल. मी स्वप्ने पाहात नाही. तर युती पुन्हा सत्तेवर आली पाहिजे हे बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध आहे. तरीही शिवसैनिकांच्या भावनेचा मी सन्मान करतो.

Leave a Comment