डबलडेकर केबल कारची लुटा मजा

cable
पर्यटनासाठी जाताना पर्यटक ज्या ठिकाणी जायचे तेथले काय वैशिष्ठ्य आहे याचा प्रथम शोध घेत असतात. पर्यटनासाठी जेथे जायचे तेथे कांही नवीन, थ्रिलींग अनुभव घेता यावा, जगावेगळे कांही तरी पाहायला मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. स्वित्झर्लंडचे पर्यटन करायचे ते तेथील अद्भूत निसर्गसौदर्याकरताच. पण या आनंदात आणखी भर पाडून घ्यायची असेल तर तेथे चालविल्या जात असलेल्या डबलडेकर केबल कारची मजा लुटायलाच हवी.

जगातली ही पहिलीवहिली ओपन अपर डेक असलेली केबल कार किंवा डबलडेकर ट्रामवे २०१२ सालच्या जूनमध्ये सुरू करण्यात आली आहे. माऊंट स्टॅन्सरहॉर्नची पायथ्यापासून ते समिट पॉइंटची सफर ही केबल कार घडविते. केवळ ६ मिनिटात ही केबल कार प्रवाशांना ६०६९ फूट उंचीवरील समिट स्टेशनवर घेऊन जाते आणि या प्रवासादरम्यान खोल दर्‍या, उंच पर्वतशिखरे आणि हिरवीगार कुरणे तसेच शेताच्या विविध रंगी तुकड्यांचे अत्यंत मनोहर दर्शन घडविते.

असे सांगितले जाते की या पर्वताची सैर फार पूर्वीपासून केली जात असून १८९३ साली येथे हा प्रवास रेल्वेच्या सहाय्याने केला जात असे. त्यानंतर १९७० मध्ये त्याची जागा केबल कारने घेतली. मात्र ही केबलकार सर्वसामान्य केबल कारप्रमाणे होती. आताची केबलकार डबल डेकर आहे. वरचे डेक ओपन असल्याने प्रवासी उडड्यावर बसून निसर्गसौदर्याचा अनुभव घेऊ शकतात. एकावेळी या केबलकारमधून ६० प्रवासी प्रवास करू शकतात. खालच्या मजल्यावर ३० प्रवासी बसू शकतात व वरच्या डेकवर ३० प्रवासी उभे राहू शकतात. स्टॅन्सरहॉर्न कॅब्रियो केबल कार या नावानेही ही केबलकार चालविली जाते.

Leave a Comment