आठ राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कॉंग्रेसची रणनीती

congress
मुंबई – देशात आठ राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचार कॉंग्रेसमध्ये सुरु असून महाराष्‍ट्र प्रदेश काँग्रेसमध्येही नेतृत्व बदलाचे वारे वाहत आहेत.मात्र त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सुगीचे दिवस येऊ शकतात; पण पेड न्यूजप्रकरणी निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिल्यास अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशी चर्चा कॉंग्रेसच्या गोटात आहे.

लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर सैरभैर झालेल्या काँग्रेस मुख्यमंत्री बदलू की प्रदेशाध्यक्ष अशा पेचात सापडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयासाठी प्रदेशाध्यक्षपदी एखादा तगडा नेता नेमण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यात अशोक चव्हाण यांचे नाव अग्रेसर आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2009 मध्ये निवडणूक लढली होती. या निवडणुकीत दणदणीत यशही चव्हाणांनी मिळवून दिले होते. मात्र, आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहाराचा मुद्दा उफाळून आल्याने अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र, चौकशीनंतर ‘आदर्श’च्या मुद्द्यातील हवा आता निघून गेल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याच्या विचारात आहेत. लोकसभा पराभवानंतर कॉग्रेसकडून देशभरात मोठे फेरबदलांची नांदी सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून आता लोकसभा निवडणूक हरलेल्या आठ ते दहा राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदण्याची दाट शक्यता आहे. ज्या राज्यांमध्ये कॉग्रेसचा दारूण पराभव झाला आहे अशा या राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचा हकालपट्टी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत पक्षाची दाणादाण उडाली, अशोक चव्हाण हे मात्र या परिस्थितीतही विजयी झाले आहेत. त्यांच्या पेड न्यूज प्रकरणाची सुनावणी जवळपास आटोपली असून आता निकालाची वाट बघितली जात आहे. त्यांना क्लीन चिट मिळाल्यास प्रदेशाध्यक्षपद चव्हाणांकडे येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment