तुकोबांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान

palkhi
श्रीक्षेत्र देहू टाळ-मृदंगाचा गजर…विणेचा झंकार…व तुकोबा-तुकोबा नामाचा जयघोष…अशा भारलेल्या वातावरणात व भक्तीच्या कल्लोळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने दुपारी चारच्या सुमारास देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

प्रस्थानाचा हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ साठवण्यासाठी लाखो वैष्णवांनी इंद्रायणीकाठी दाटी केली होती.संत तुकाराम महाराजांच्या या 329 व्या पालखी प्रस्थान सोहळयासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. इंद्रायणीचा अवघा परिसर वारकरीमय झाला होता. वैष्णवांच्या या मांदियाळीतच प्रस्थानाचा सोहळा रंगला. भल्या पहाटे घंटानादाने देहू गाव जागा झाला. देहूच्या मुख्य देऊळवाडय़ातील शिळा मंदिरात पहाटे 4 वाजता संस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते महापूजा झाली. त्यानंतर 5.30 वाजता श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात, सकाळी 6 वाजता वैकुंठस्थान मंदिरात व 7 वाजता तपोनिधी नारायण महाराज मंदिरात महापूजा पार पडली.. दुपारी चार वाजता पालखी प्रस्थान सोहळयाला प्रारंभ झाला. परंपरेनुसार ज्येष्ठ वारकऱयांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सपत्निक पादुकांची पूजा केली. त्यानंतर पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. दुपारी चारच्या सुमारास पालखीने प्रस्थान ठेवले. तसा टाळ-मृदंगाचा आवाज टीपेला पोहोचला. वारकरी विठ्ठलनामासोबत डोलू लागले, नाचू लागले. अवघा आसमंत विठ्ठलमय झाला. काहींना तुकाबांच्या पादुकांवर माथा ठेवण्याचे भाग्य लाभले. त्यांनी धन्यत्वाचा अनुभव घेतला. तर काहींनी मनोभावे नमस्कार करीत तुकोंबाचरणी आपली सेवा रुजू केली. हरिनामाच्या गजरात अवघी देहुनगरी दुमदुमून गेली. सायंकाळी प्रदक्षिणेनंतर पालखी मुक्कामासाठी इनामदार वाडयात विसावणार आहे .

Leave a Comment