सेना पक्षप्रमुखांचे ‘एका दगडात दोन पक्षी ‘

shisena
मुंबई – जनता जनार्दनाच्या कृपेने लोकसभेत शिवसेनेचे अनेक खासदार निवडून गेले,असे नमूद करताना नरेंद्र मोदींच्या लाटेचा नामोल्लेख टाळताना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वतः निवडणूक लढविणाऱ्या आणि लोकसभा निवडणुकीत मोदीना पाठिंबा देणाऱ्या मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा शकुनी या शब्दात सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे पण एका दगडात दोन पक्षी त्यांनी टिपल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची रणनीती काय असेल हा मुद्दा महत्वाचा ठरला आहे.

‘सामना’ या मुखपत्रातील अग्रलेखात मनसेवर सडकून टीका करण्यात आली आहे, शिवसेनेच्या लोकसभा विजयाचे शिल्पकार राज्यातील तमाम शिवसैनिक आहेत आणि त्यांच्यामुळे मोदी सरकारला महाराष्ट्रातून भक्कम आधार लाभला आहे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले तर आहेच शिवाय देशात जसे नरेंद्र मोदींचे एकहाती व एककलमी राज्य पूर्ण बहुमताने आले तसे एकवचनी पूर्ण बहुमताचे भगवे राज्य शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात यावे ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे. कारण महाराष्ट्रात भक्कम महायुतीचे नेतृत्व शिवसेना करीत आहे.याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

आम्ही महाराष्ट्राला शंभर टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार आहोत, हे आमचे वचन आहे, असेही म्हटले आहे.तसेच शिवसेना हे एक फार मोठे कुटुंब आहे. हे कुटुंब असले तरी इथे इस्टेटीचे झगडे नाहीत व खुर्च्यांचे वाद नाहीत. ज्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी झगडे केले आणि त्यासाठी जे बाहेर पडले ते शिवसेना सोडताच नेस्तनाबूत झाले,असा टोमणाही राज ठाकरेना उद्देशून लगावण्यात आला आहे शिवाय राज हे शिवसेनेला अपशकुन करणारे शकुनीमामा आहेत, असेही म्हटले आहे. अग्रलेखातून लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने सेनेचे उमेदवार निवडून आले असा दावा म्हणा आरोप करणाऱ्यांना उद्धव यांनी महाराष्ट्रातून आम्हीच बळ दिले असे प्रत्युत्तर दिल्याने तसेच राज यांना चिमटा काढल्याने ‘एका दगडात दोन पक्षी ‘टिपण्याची खेळी वेळवर साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Leave a Comment