शेती व्यवसायाविषयी दृष्टीकोन

sheti
भारतातल्या शेतकर्‍यांचे एक सर्वेक्षण करण्यात आले. शेतकर्‍यांना त्यांचा व्यवसाय आवडतो का, असा प्रश्‍न करण्यात आला. तेव्हा ४० टक्के शेतकर्‍यांनी आपल्याला हा व्यवसाय आवडत नाही, असे स्पष्ट सांगितले. केवळ निरुपाय म्हणून आपण हा व्यवसाय करत आहोत असे त्यांचे म्हणणे होते. यापेक्षा चांगला पर्यायी व्यवसाय मिळाला तर आपण तो व्यवसाय करायला तयार आहोत असे त्यांनी नमूद केले. शेतकरी कुटुंबातील मुले आज शेती सोडून नोकर्‍या करत आहेत किंवा अन्य व्यवसाय करत आहेत. ती मुले याच वर्गातली आहेत. त्यांना पर्यायी व्यवसाय सापडला आहे म्हणून त्यांनी शेती सोडून तरी दिलेली आहे किंवा आपला पर्यायी व्यवसाय करत करत ते शेती व्यवसाय सुद्धा उंटावरून शेळ्या हाकल्यासारखा करत आहेत. हा शेतीला कंटाळलेला वर्ग आहे.

दुसर्‍या ४० टक्के शेतकर्‍यांनी शेती बरी का वाईट असा विचारच केला नव्हता. घरात शेती आहे म्हणून शेती करतो, दुसरे काही येत नाही म्हणून शेती करतो किंवा मागचा पुढचा कसलाही विचार न करता ओघाने शेती करतो, असे त्यांनी सांगितले. शेतीमुळे त्यांना उत्तम जीवन जगता येत नाही. परंतु त्याची त्यांना खंत सुद्धा नाही. ते शेतीच करायची आणि शेतीमुळे जे जे वाट्याला येईल ते सहन करायचे हा त्यांचा जीवनक्रम आहे. आपल्या मुलांनी शेतीच करावी असाही त्यांचा आग्रह नाही आणि शेती सोडावी अशीही काही त्यांची कल्पना नाही. या लोकांनी शेतीची अन्य व्यवसायाशी कधी तुलना केलेली नाही. विदर्भातील एक नामांकित लेखक, बारोमास या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीचे लेखक सदानंद देशमुख यांच्या साहित्यात या शेतकर्‍यांचे चित्र उमटलेले दिसते. हा वर्ग प्रामुख्याने दुसरे काही येत नाही म्हणून शेती करतो आणि आपल्यापेक्षा ‘नवकरी’ करणारा माणूस सुखी असतो अशी मात्र जाणीव त्याच्या मनात असते.

उरलेला २० टक्के शेतकरी मात्र जाणीवपूर्वक शेती करणारा आणि शेती व्यवसाय आवडणारा आहे. जगाच्या तंत्रज्ञानात सतत बदल होत असतात तसे शेतीच्या तंत्रज्ञानात सुद्धा बदल झालेले आहेत आणि त्या बदलांची जाणीव ठेवून नियोजनपूर्वक शेती केली तर शेती व्यवसाय चांगला आहे असे त्यांचे मत असते. असे शेतकरी संख्येने कमी असले तरी त्यांच्या या मताला किंमत आहे कारण या मतातूनच शेती व्यवसाय बळकट होण्यास मदत होणार आहे. आज जरी हे प्रगतशील शेतकरी संख्येने कमी असले तरी बहुसंख्य शेतकरी उद्या चालून का होईना पण त्यांच्या मागे येणार आहेत.

शेती व्यवसायाविषयी अशी अनेक प्रकारची मते व्यक्त होत असतात. भारतातल्या शेतकर्‍यांविषयी खूप काही बोलले जात असते. शेतकरी हा कर्जातच जन्मतो आणि कर्जातच मरतो, असा वाक्प्रचार रुढ झालेला आहे. तो आपण एवढा मान्य केलेला आहे की, शेतकरी म्हटल्यानंतर त्याला कर्ज असणारच, असे आपण गृहित धरून चाललो आहोत. परंतु कर्जात न अडकलेला स्वावलंबी, स्वाभिमानी शेतकरी उभा करणे शक्य आहे. काही शेतकरी तसे आहेत सुद्धा. वर उल्लेख केलेल्या शेतकर्‍यांच्या तीन वर्गांपैकी शेवटचा २० टक्के वर्ग असा स्वावलंबी आहेच. अन्य शेतकरी असे स्वावलंबी होऊ शकतात असेही त्यांचे मत आहे. मात्र काही निवडक शेतकर्‍यांनीच असे स्वावलंबी असण्यापेक्षा सर्व शेतकर्‍यांनी असे असले पाहिजे.

व्यापारीसुद्धा कर्ज घेत असतात. पण ते कर्जाच्या सापळ्यात सापडत नाहीत आणि कर्जात जन्मून कर्जात मरत नाहीत. मग शेतकर्‍यांच्या नशिबाला कर्जातच जन्मणे आणि कर्जातच मरणे का लिहिलेले आहे ? याचा विचार करावा लागेल. नुकतेच एका माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीशी गप्पा मारत होतो. सध्या माहिती तंत्रज्ञानाची ङ्गार चलती आहे. परंतु या तज्ञाच्या मते ही चलती आणखी ङ्गार तर दहा वर्षे आहे. अनेक व्यवसायांचे असेच होते. काही दिवस चलती असते आणि ती काही दिवसांनी कमी होते. मात्र त्यांच्या मते शेती हाच एकमेव असा व्यवसाय आहे की, ज्या व्यवसायाची चलती कधीच कमी होत नाही. माहिती तंत्रज्ञानापेक्षा सुद्धा शेतीला अधिक चांगले भवितव्य आहे, असे त्यांचे ठाम मत होते.

अनेक शेती तज्ञांंशी बोलून, स्वत: काही वाचून, अनुभवून आणि निरीक्षण करून मीही याच एका निष्कर्षाप्रत आलो आहे की, शेतीला चांगले भवितव्य आहे. शेतकरी सुद्धा तशी आशा बाळगून आहे. परंतु तो काहीसा निराश झालेला आहे. ही निराशा झटकून चांगली शेती करण्याची त्याची इच्छा सुद्धा आहे. तशी ती करायची झाली तर खालील पाच सूत्रे उपयोगी पडतील, असे वाटते.

१) रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून सेंद्रीय खतांचा वापर वाढवणे. २) पावसाने कितीही हुलकावण्या दिल्या तरी जलसंधरणाच्या माध्यमातून त्यावर मात करणे. ३) महाराष्ट्र हे जगातले ङ्गलोत्पादनासाठीचे आदर्श राज्य आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या शेताचा एक हिस्सा ङ्गळबागायतीखाली गुंतवणे. ४) हातात सातत्याने पैसा खेळत रहावा यासाठी आणि सेंद्रीय खतांसाठी जोडधंदा करणे. आणि ५) आपल्या शेतात तयार होणार्‍या मालावर शक्यतो कसली ना कसली प्रक्रिया करून नंतरच तो विकणे.

व्यापारीही कर्ज घेतो, परंतु एकदाच. नवीन दुकान सुरू करण्यासाठी कर्ज घेतले म्हणजे प्रत्येकवेळी नवा माल भरताना तो बँकेत कर्ज मागायला जात नाही. मग शेतकर्‍याला हे का शक्य होत नाही. विहीर खोदणे, मोटारपंप बसवणे, नवीन बागेची लागवड, ट्रॅक्टर खरेदी अशा भांडवली गुंतवणुकीला शेतकर्‍याला कर्ज घ्यावे लागले तर हरकत नाही. पण प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीला, प्रत्येक पिकासाठी त्याला पीक कर्ज का घ्यावे लागते, हा प्रश्‍न आहे. असे कर्ज घ्यावे न लागणारा शेतकरी या पाच सूत्रातून उभा राहू शकेल, असा विश्‍वास वाटतो.

Leave a Comment