सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर दहशतवाद्यांचा हल्ला

oil-rifinary
बगदाद- बुधवारी पहाटे बैजी येथील देशातील सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर इराकमधील सुन्नी जेहादी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. सर्वात मोठी रिफायनरी पेटवल्याने तेलाचे भाव आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.

पहाटे चारच्या सुमारास आलेल्या तीन दहशतवाद्यांनी रिफायनरीच्या सुरक्षारक्षकांवर बंदूक आणि रॉकेटद्वारे बेछूट हल्ला चढवला. या धुमश्चक्रीतच त्यातील दोघांनी आतमध्ये प्रवेश करुन तेलाच्या टाकीवर लाँचरद्वारे हल्ला केला. त्यामुळे रिफायनरीने पेट घेतल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले.

मागील आठवड्यात दहशतवाद्यांनी उत्तर इराकचा बहुतांश भाग ताब्यात घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रिफायनरी भागात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तरीही दहशतवाद्यांनी आतमध्ये घुसून रिफायनरीला आग लावली.

इराकमधील सत्ता उलथवून तेथे इस्लामी इराक स्थापन करण्यासाठी सुन्नी जेहादी दहशतवादी आणि इराक सरकारमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे संपूर्ण इराक देशातील स्थिती पूर्णपणे बिघडली आहे.

या दहशतवाद्यांच्या विरोधात अमेरिकेने कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, इराकमधील या हिंसाचारामुळे जागतिक बाजारात तेलाचे भाव वाढत आहेत. त्यातच आता सर्वात मोठी रिफायनरी पेटवल्याने तेलाचे भाव आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.

Leave a Comment