उद्या देहूतून तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

varkari
पुणे : संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळयासाठी देहू नगरी सज्ज झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱयातून वारकरी देहूत दाखल झाले असून, गुरूवारी (दि. 19) दुपारी चार वाजता तुकोबांची पालखी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

पालखी प्रस्थान सोहळयानिमित्त देहूच्या मुख्य देऊळवाडय़ातील शिळा मंदिरात पहाटे 4 वाजता संस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते महापूजा होईल. त्यानंतर 5.30 वाजता श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात, सकाळी 6 वाजता वैकुंठस्थान मंदिरात व 7 वाजता तपोनिधी नारायण महाराज मंदिरात महापूजा होईल. सकाळी 9 वाजता देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी चार वाजता पालखी प्रस्थान सोहळयाला प्रारंभ होणार आहे. परंपरेनुसार वारीतील ज्येष्ठ वारकऱयांच्या हस्ते पादुकांची पूजा होईल. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील सपत्नीक पादुकांची पूजा करतील. त्यानंतर पादुका पालखीत ठेवण्यात येतील. देऊळवाडयाला प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखी सोहळयाचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी मंदिरात पादुका नेण्यात येतील. त्यानंतर पालखी मुक्कामासाठी इनामदार वाडयात पोहचेल. पालखी प्रस्थान सोहळयासाठी राज्यभरातील दिंडया देहूत दाखल होत आहेत.

Leave a Comment