अवघी अलंकापुरी भक्तिरसात चिंब

wari
आळंदी : भागवत धर्माची पताका उंचावत माऊली-तुकोबांच्या जयघोषाने अलंकापुरी दुमदुमली आहे. अखंड हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात चिंब झाला असून अलंकापुरीत दाखल झालेल्या वारकरी-भाविकांनी पहाटेपासून पवित्र इंद्रायणी नदीवर स्नानासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी करीत आहेत.

संपूर्ण अलंकापुरीत अखंड हरिनाम सुरू असल्यामुळे पहाटेपासूनच हरिनामाचा जयघोष सुरू झाला आहे . अलंकापुरीत दिंड्यांचे आगमन होत असून ‘ज्ञानेश्‍वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’चा जयघोष करीत भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकर्‍यांचा भक्तिसागर लोटला आहे . अभंग व टाळ-मृदंगाच्या नादातील भजनाने शहर न्हाऊन निघाले असून इंद्रायणीचा घाट भाविकांनी सजला आहे. सर्व रस्ते, प्रदक्षिणा मार्ग, माऊली मंदिर परिसर, महाद्वार येथे भाविकांच्या गर्दीने परिसर फुलला आहे. माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकर्‍यांच्या गर्दीने अलंकापुरी गजबजली असून मठ, मंदिरे, धर्मशाळा व राहुट्यांमध्ये अखंड हरिनामाच्या गजरात वारकरी मग्न झाले आहेत. शुक्रवारी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता महाराष्ट्रातून वृद्ध महिला-पुरुष वारकरी, माऊली व विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले दिसत आहेत.

Leave a Comment