‘फेसबुक’ खातेधारकांवर हेरगिरी !

facebook
नवी दिल्ली – आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्यांना त्यानुसार सेवा आणि जाहिरात पुरवणार्‍या ‘गुगल’च्या पावलावर पाऊल ठेवून फेसबुकसुद्धा आपल्या खातेधारकांची हेरगिरी करणार आहे. जगातील सर्वात मोठे सोशल माध्यम ‘फेसबुक’ने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.

फेसबुक आपण काय ‘लाईक’ करतो? किंवा काय ‘स्टेटस अपडेट’ टाकतो, यावर कंपनी बारकाईने नजर ठेवून आहे. विशेष म्हणजे हेरगिरीचा हा प्रकार आज किंवा उद्यापासून नव्हे, तर अनेक दिवसांपासून सुरू असून, यापुढेसुद्धा सुरू राहणार असल्याचे कंपनीने मान्य केले. हा सर्व खटाटोप चालला आहे केवळ जाहिरातींचा वर्षाव करण्यासाठी.. ‘गुगल’च्या सर्च इंजिनवर एखादी वस्तू, सेवा, व्यक्ती किंवा कुठलाही प्रकार शोधल्यानंतर पुढे इंटरनेट वापरताना संबंधित व्यक्तीला आपण शोधलेल्या वस्तूच जाहिरातींच्या माध्यमातून दाखवल्या जातात. जाहिरातींचा हा फंडा ‘फेसबुक’ वरदेखील अशाच प्रकारे सुरू आहे. कदाचित फेसबुक वापरणार्‍या काही लोकांना याचा अनुभव आला असावा. सोशल माध्यमावर ‘आय डू नॉट वॉन्ट टू सी धिस’ म्हणजेच मला हे पाहायचे नाही, या लिंकवर क्लिक करून असले प्रकार टाळता येतात. कालांतराने फेसबुक ही सुविधाही बंद करू शकतो. इंटरनेटवर हेरगिरीविरोधी कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र विरोध व्यक्त केला. तसेच फेसबुक आणि इतर सोशल माध्यमांनी ही सेवा बंद करावी, अशी मागणी केली.

Leave a Comment