मुंबई – पोलीस हे जनता तसेच कायद्याचे रक्षक आहेत. ते आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे नागरिकांनी त्यांचा आदर केलाच पाहिजे, असे महत्त्वपूर्ण मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना केली जाणारी शिवीगाळ व मारहाणीच्या घटनांत वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांप्रती सहानुभूती प्रकट केली.
पोलीसांप्रती न्यायालयाची सहानभूती; आदराने वागा, नागरिकांना सूचना
आरोपीचे फोटो काढण्यास मनाई केल्यामुळे याचिकाकर्त्याने पोलीस अधिकार्याला शिवीगाळ केली. असे प्रकार वारंवार घडत असल्याने न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती पी. डी. कोदे यांच्या खंडपीठाने नागरिकांना पोलिसांशी आदराने वागण्याचा सल्ला दिला. सद्यस्थितीत बहुतांश रस्त्यांवर पोलिसांना वाहनचालकांकडून वाईट वागणूक मिळत असल्याचा अनुभव न्यायमूर्ती कानडे यांनी सुनावणीदरम्यान कथन केला. गेल्या आठवड्यात कारने प्रवास करत असताना एक दृश्य दिसले. एका चालकाने आपली गाडी रस्त्याच्या मध्यभागी थांबवली. जेव्हा पोलीस कॉन्स्टेबल पुढे जाऊन त्या चालकाला गाडी बाजूला करण्यास सांगू लागला, तेव्हा चालकाने पोलिसाला अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ केली. चालकाने तसे वागणे चुकीचे असल्याचे नमूद करत न्यायमूर्तींनी पोलिसांशी नागरिकांनी सौजन्याने वागले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त या वेळी केली.