बीजिंग – कोण काय व्यवसाय करेल याचा काही नेम नाही . कुक्कुटपालन, मत्स्यपालन तसेच वराहपालनाचाही उद्योग असू शकतो, परंतु झुरळपालनाचा अनोखा उद्योग आजपर्यंत कोणी ऐकला नसेल. पण चीनमधील एका महिलेने थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १ लाख झुरळे पाळली असून त्याद्वारे ती पैसा कमावत आहे, आहे ना हे एक नवल !
झुरळे पाळून ‘ती’ कमविते बक्कळ पैसा !
चीनच्या फुजियान प्रांतातील युआन मेक्सिया नामक महिलेने आपल्या घरात झुरळे पाळली आहेत. सुरुवातीला शे-दोनशे झुरळांपासून सुरुवात करणार्या मेक्सियाच्या घरात आता लाखाच्यावर झुरळे झाली आहेत. झुरळांची संख्या वाढल्याने ती आता दुसर्या घरात राहत असली तरी दिवसातून किमान एकदा तरी ती या झुरळांच्या भेटीला येते. आपल्या पोटच्या पोरांसारखे या झुरळांचा सांभाळ करणारी मेक्सिया दररोज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ खाण्यास देते. मेक्सियाने एवढी झुरळे हौस म्हणून नाही, तर पैसे कमावण्यासाठी पाळली आहेत. चिनी औषधनिर्मात्या कंपन्या झुरळांपासून काही औषधांची निर्मिती करतात आणि त्यासाठी त्यांना मोठय़ा प्रमाणात झुरळे लागतात. या कंपन्यांची मागणी मेक्सिया पूर्ण करते. एका किलोसाठी तब्बल १00 डॉलर्स म्हणजेच सुमारे ६ हजार रुपये, इतक्या प्रचंड भावाने तिची झुरळे विकली जातात.