वाहनांचे बनावट स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय तेजीत

sparepart
पुणे – वारंवार घातले गेलेले छापे आणि तपासण्यांनंतरही भारतात वाहनांच्या बनावट सुट्या भागांची विक्री तडाखेबंद होत असल्याचे ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिशन तर्फे जाहीर करण्यात आले आहे. असोसिएशनच्या अंदाजानुसार वाहन बनावट सुटे भाग विक्रीच्या व्यवसायातील उलाढाल वर्षाला ११ ते १४ हजार कोटींच्या दरम्यान होत आहे. तीन वर्षापूवी केलेल्या सर्वेक्षणात ही उलाढाल ८५०० कोटींच्या आसपास होती. बनावट सुटे भाग व्यवसायाचा वाटा एकूण सुटे भाग व्यवसायाच्या वाट्यात ३० ते ४० टक्के इतका असल्याचे निदर्शनास आले आहे. सुटे भाग व्यवसायाची उलाढाल ३५ हजार कोटींच्या घरात आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष हरीश लक्ष्मण या संबंधी अधिक माहिती देताना म्हणाले की साधारणपणे क्लच, फिल्टर लँप, वायपर, बेअरिंग, स्टीअरिंग आर्म असे बनावट सुटे भाग विक्री अधिक प्रमाणात होतेच पण अत्यावश्यक आणि महत्त्वाचे असे ब्रेक, ब्रेक लायनरही बनावट विकले जातात. केवळ कार आणि यूएसव्ही साठीच बनावट भाग विकले जातात असे नाही तर दुचाकी, ट्रक, बसेस साठीही बनावट सुटे भाग सर्रास विकले जातात. ते मूळ सुट्या भागांपेक्षा २५ ते ३० टक्के स्वस्त पडतात.

देशात बनावट सुटे भाग विक्री, उत्पादनासाठी कडक कायदा नाही. त्यातून असंघटीत क्षेत्रातील छोट्या कंपन्या असे भाग बनविण्यात पुढे असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. वाहनांना होत असलेल्या अपघातात असे बनावट भाग वापरल्यामुळे होणारया अपघातांचे प्रमाण मोठे आहे. २०१२ सालात सुमारे पाच लाख अपघात झाले आहेत आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दीड लाखांच्या आसपास आहे.

विशेष म्हणजे या उद्योगामुळे सरकारचाही वर्षाला २२०० कोटींचा महसूल बुडतो आहे. शिवाय कार उत्पादकांना आपल्या ब्रँडच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याचे अनुभव येतात. त्यामुळे कार उत्पादकांनीच आता स्थानिक पोलिसांच्या मदतीने असे उत्पादन होत असलेल्या युनिटवर छापे घालण्याचे काम सुरू केले आहे. टाटा मोटर्सने अशाप्रकारे रेड टाकून ३३ उत्पादकांकडून बनावट सुटे भाग जप्त केले आहेत. हे उत्पादक टाटा ब्रँडखालीच हे बनावट सुटे भाग तयार करत होते असेही आढळून आले आहे.

Leave a Comment