विक्रमी निकाल, दहावीतही मुलींचीच बाजी

result
पुणे – राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीचा 88.32 टक्‍के निकाल लागला असून, हा आजवरचा बारावीप्रमाणे विक्रमी निकाल आहे. दहावी परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्याच्या एकूण निकालात कोकणचा सर्वाधिक, तर लातूरचा सर्वात कमी निकाल आहे. निकालात पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. दहावीचा निकाल यावर्षी साडेतीन टक्‍क्‍यांनी वाढला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2014 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आज दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. दहावी परीक्षेसाठी एकूण 15 लाख 55 हजार 984 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 49 हजार 784 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 13 लाख 68 हजार 796 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्‍केवारी 88.32 इतकी आहे. हा निकाल आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. बेस्ट फाईव्ह आणि नवीन अभ्यासक्रमामुळे यंदा निकाल वाढला आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल साडेतीन टक्‍क्‍यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी दहावीचा नियमित विद्यार्थ्यांचा 84.90 टक्‍के निकाल होता. या परीक्षेत 7 लाख 32 हजार 218 विद्यार्थी, तर 6 लाख 36 हजार 578 मुली उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण 90.55 टक्‍के, तर 86.47 टक्‍के मुले उत्तीर्ण झाले आहेत. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण चार टक्‍क्‍यांनी जास्त आहे.
यंदाही कोकण विभागाचा सर्वाधिक 95.57 टक्‍के निकाल लागला आहे. सर्वात कमी निकालाची नोंद लातूर विभागाची असून, त्याची टक्‍केवारी 81.68 आहे. कोकणनंतर कोल्हापूर विभागाचा 93 टक्‍के, तर पुणे विभागाचा 92 टक्‍के निकाल लागला आहे. विभागात यंदा पुण्याने मुंबईला मागे टाकत निकालात आघाडी मिळविली आहे. राज्यात एकूण 1 लाख 69 हजार 179 पुनर्परीक्षार्थ्यांनी (रिपीटर) परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 68 हजार 508 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 35 हजार 926 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णाची टक्‍केवारी 21.32 इतकी आहे. गेल्या वर्षी तुलनेत यंदा पुनर्परीक्षार्थी परीक्षेला निकाल 10 टक्‍क्‍यांनी कमी लागला आहे. मागील वर्षी रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल 32.19 टक्‍के लागला होता. रात्र शाळेचा निकाल 73.93 टक्‍के, तर अपंग विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 85.68 टक्‍के लागला आहे.

यावर्षी 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 40 हजार 797 इतकी आहे. गेल्या वर्षी ही संख्या 31 हजार 97 होती. यंदा 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या संख्येत 9 हजार 700 विद्यार्थ्यांची भर पडली आहे. राज्यात जिल्हानिहाय निकालात सिंधुदर्ग जिल्ह्याचा सर्वाधिक 96.45 टक्‍के, तर सर्वात कमी निकाल नांदेड जिल्ह्याचा 74.29 टक्‍के लागला आहे. शून्य टक्‍के लागलेल्या राज्यात शाळांची संख्या 105 असून, 100 टक्‍के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 3 हजार 949 आहे. शून्य टक्‍के निकालात मुंबई विभागातील सर्वाधिक शाळा असून, 100 टक्‍के निकालात पुणे विभाग आघाडीवर आहे.

टक्‍केवारी
पुणे 92.35, नागपूर 82.93, औरंगाबाद 87.06, मुंबई 88.84, कोल्हापूर 93.83, अमरावती 84.11, नाशिक 89.15, लातूर 81.68, कोकण 95.57

रिपीटर विद्यार्थ्यांना आता नवीन अभ्यासक्रम

गेल्या वर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. मात्र, पुनर्परीक्षार्थी (रिपीटर) विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेला बसण्याची ही शेवटची संधी होती. त्यानुसार निकाल जाहीर करण्यात आला. परंतु आता यापुढे रिपीटर विद्यार्थ्यांचा एखादा विषय राहिला असेल, त्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावे लागणार आहे. दहावीची येत्या ऑक्‍टोबरमध्ये होणारी परीक्षा नवीन अभ्यासक्रमावर आधारित राहील, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.

Leave a Comment