राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात एकला चलो रे

Sharad pavar
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकात कॉग्रेसने निम्म्या जागा राष्ट्रवादीला दिल्या नाहीत तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुका लढवेल असे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बोलणी सुरू आहेत. लोकसभेचे निकाल पाहता राष्ट्रवादीची परिस्थिती काँग्रेसच्या तुलनेत अधिक चांगली असल्याने राष्ट्रवादीने निम्म्या जागांवर दावा सांगितला आहे मात्र काँग्रेस त्यासाठी अनुकुल नाही.

राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची १९९९ पासून युती आहे. राष्ट्रवादीची स्थापनाच १९९९ ला झाली आणि त्यावेळच्या निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादीने वेगवेगळ्याच लढविल्या होत्या. निवडणुकात राष्ट्रवादीने पहिल्याच झटक्यात ५८ जागा मिळविल्या आणि नंतर सत्तेत येण्यासाठी कॉग्रेसबरोबर युती केली होती. त्यानंतरच्या म्हणजे २००४ व २००९ सालच्या निवडणुका मात्र त्यांनी एकत्र लढविल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसने १७० तर राष्ट्रवादीने ११३ जागा लढविल्या होत्या.

लोकसभा निवडणुकांनंतर बदललेली परिस्थिती आणि काँग्रेसची बिकट अवस्था पाहता राष्ट्रवादीचे खालच्या स्तरावरचे नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे जागा वाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणुका लढवू असा संकेत दिला आहे.