महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक जवळ आली की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढण्याची वल्गना करते आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना धमकावते आणि कॉंग्रेसने डोळे वटारले की राष्ट्रवादी शरण येतात आणि दबावतंत्राने जेवढे काही पदरात पडले असेल तेवढ्यावर समाधान मानून गळ्यात गळे घालून निवडणूक लढवतात. १९९९ साली सत्तेवर आल्यापासून या दोन पक्षांचे वर्तन ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असे राहिलेले आहे. आता आघाडीलाच महायुतीमुळे प्रचंड धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत तसे दिसून आले आहे. पण तरीही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातला परस्परांवर कुरघोडी करण्याचा शिरस्ता अजूनही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. नेहमीप्रमाणेच निवडणुकीचे वेध लागले की राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी जागावाटपात रस्सीखेच सुरू केली आहे. तशी तर महायुतीमध्येसुध्दा रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना १७१ जागा आणि भाजपा ११७ जागा असे जागा वाटप १९८७ पासून चालत आलेले आहे. परंतु सध्या देशात मोदी लाट असल्यामुळे शिवसेनेने कमी जागा लढवाव्यात आणि भाजपाला जास्त जागा सोडाव्यात अशी मागणी भाजपाने सुरू केली आहे. त्यावरून महायुतीत काहीसा संघर्ष निर्माण झाला आहे.
आघाडीत रस्सीखेच सुरू
महायुतीत अशी काही गडबड सुरू झाली की, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना फार आनंद वाटतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील या संघर्षाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेविषयी सहानुभूती व्यक्त केली. खरे म्हणजे त्यांना शिवसेनेचा उमाळा येण्याची काही गरज नाही, परंतु या निमित्ताने भाजपा आणि शिवसेनेतल्या भांडणाच्या आगीत तेल ओतता आले तर बरे असे म्हणून मलीक यांनी शिवसेनेविषयी सहानुभूती व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये भाजपाने नेहमीच शिवसेनेवर कुरघोडी केली आहे, स्वत:ची फारशी ताकद नसताना शिवसेनेवर सतत दबाव आणून शिवसेनेच्या जोरावर आपली ताकद वाढवून घेतली आहे, असे रॉकेल नवाब मलीक यांनी ओतले. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील ही कथित ओढाताण कितपत खरी आहे आणि भाजपाने अशी आपली ताकद वाढवली असेल तर तशी ती वाढवणे कितपत योग्य आहे याची वेगळी चर्चा करता येईल. परंतु नवाब मलीक यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसशी असलेली आपली आघाडी स्वत:ची ताकद वाढविण्यासाठीच वापरत आला आहे. किंबहुना आघाडी करून मित्र पक्षाची ताकद क्षीण करणे हे शरद पवार यांचेच खरे वैशिष्ट्य आहे.
नवाब मलीक भाजपावर जो आरोप करतात तो आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच अधिक फिट्ट बसतो. भाजपाने आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करणे गैर नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ११७ जागा लढवून ६८ जागा मिळवल्या होत्या आणि शिवसेनेने १७१ जागा लढवून ६१ जागा मिळवल्या होत्या. हे प्रमाण विचारात घेतले असता भाजपाने आणखी जास्त जागांची मागणी करणे चुकीचे नाही. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेसकडून ज्या जास्त जागा मागून घेत आहे त्यामागे असा कसलाही हिशेब नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेस पक्षाच्या अडचणीचा फायदा घेऊन जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या दोन पक्षाची आघाडी झाल्यापासून राज्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने जागा वाढवून घेण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आधी स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा करायची, नंतर जागा वाढवून मागायच्या आणि जमेल तेवढी आपली ताकद वाढवून कॉंग्रेसची ताकद कमी करायची असा प्रकार घडला नाही अशी एकही निवडणूक पवारांनी गेल्या पंधरा वर्षात पार पडू दिलेली नाही. आताही तोच प्रकार सुरू झाला आहे.
राष्ट्रवादीने आघाडी मोडून स्वबळावर निवडणुका लढवाव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे आणि त्यामार्फत कॉंग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहेच. खरे म्हणजे पवारांची स्वबळावर निवडणूक लढविण्याची क्षमताच नाही. त्यांनी कॉंग्रेसपासून दूर जाऊन विधानसभेची निवडणूक लढवली तर त्यांच्या आघाडीत होणार्या मतविभागणीचा फायदा महायुतीलाच होईल आणि महायुतीच्या जागा वाढतील हे पवारांना चांगलेच कळते. परंतु पवारांचे आपले दबावतंत्र नेहमीच सुरू असते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या दबावतंत्राला चांगलेच चोख उत्तर दिले आहे. कार्यकर्त्यांनी असल्या चर्चा करण्यापेक्षा आपल्याला खरोखर आघाडीमध्ये रस आहे की नाही हे शरद पवार यांनी स्पष्टपणे स्वत: जाहीर करावे असे आव्हान त्यांनी दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्वबळावर लढण्याची खुमखुमीच असेल तर कॉंग्रेससुद्धा त्याला तयार आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अशा स्पष्ट इशार्यानंतर शरद पवार नरमतात, परंतु आपण नरमलोे आहोत हे ते दाखवत नाहीत. नंतर पवार कधी तरी देशातले भाजपाचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी सेक्युलर शक्ती एकत्र येण्याची गरज आहे असे म्हणत कॉंग्रेसशीच हातमिळवणी करतात. त्याशिवाय त्यांच्यासमोर पयायर् नाही. मात्र आता त्यांनी काहीही केले तरी राज्यातली सत्ता पुन्हा त्यांच्या हाती येण्याची शक्यता नाही. शरद पवार यांचे अनुयायी आणि त्यांचे समर्थक सत्तेशिवाय जगूच शकत नाहीत. सत्ता नसेल तर हा पक्ष सुद्धा टिकू शकत नाही. त्यामुळे आता आघाडी असो की नसो पराभव आणि पक्षाचे विघटन अटळ आहे.