बिल गेटस फौंडेशनचे महिलाना बचतीचे धडे

bill
पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहार मधील सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या महिलांना बिल अॅन्ड मिलींडा गेटस फौंडेशन तर्फे बचतीचे धडे दिले जात असून त्यात आयसीआयसीआय बँकेने सहकार्याचा हात दिला आहे. गेल्या तीन वर्षात या भागातील ७ जिल्ह्यातील सुमारे दीड लाख महिलांची बँक खाती उघडली गेली आहेत आणि पावणेचार कोटी रूपयांची बचत केली गेली आहे. विशेष म्हणजे यातील १ लाख १० हजार महिला खातेदार स्वतःच आपले खाते संचलित करत आहेत.

बिल गेटस फौंडेशनतर्फे पाच अविकसित देशात गेटवे फायनान्शियल इनोव्हेशन फॉर सेव्हींग योजना गेल्या तीन वर्षांपासून सुरू केली गेली आहे. भारतात २०१० पासून ही योजना सुरू आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश व बिहारच्या कांही भागात ६०० केंद्रे उघडली गेली आहेत. विशेष म्हणजे आयसीआयसीआय बँकेने या खातेदार महिलांना साध्या मोबाईल फोनवरून खाते नियंत्रित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून या महिला या सुविधेचा यशस्वी वापर करत आहेत असे आयसीआयसीआयचे वरीष्ठ संचालक संजीव मंत्री यांनी सांगितले. अपना खाता या नावाने ही योजना राबविली जात असून त्यात बचत खात्यात ठराविकच रक्कम शिल्लक असलीच पाहिजे असे बंधन घातले गेलेले नाही. त्यामुळे या कष्टकरी महिला जसे जमतील तसे पैसे भरू शकतात आणि छोटी मोठी कर्ज घेऊन आपल्या गरजा पूर्णही करू शकतात असेही ते म्हणाले.

Leave a Comment