पाकिस्तानात १०० दहशतवादी ठार

pakistan
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या पोलिसांनी आणि सुरक्षा जवानांनी अफगाणिस्तानशी लगत असलेल्या सीमेवरील डोंगराळ भागात विविध ठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर जबरदस्त हल्ले केले आणि १०० दहशतवाद्यांची हत्या केली. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये कराची विमानतळावर हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. अशा प्रकारे झालेला हा दुसरा दहशतवादविरोधी हल्ला आहे.

पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांत खूप वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात या दहशतवाद्यांनी कराची विमानतळावर हल्ला केला आणि ३६ जणांची हत्या केली. गेल्या महिन्यापासून पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांशी चर्चा सुरू केली आहे. परंतु ही चर्चा सुरू असतानाच अतिरेकी संघटनांनी कराची विमानतळावर हल्ला केला. त्यामुळे जनतेत तीव्र नाराजी पसरली. सरकारने वाटाघाटी करत बसण्यापेक्षा दहशतवाद्यांचा खातमा करावा, असा दबाव सरकारवर वाढत चालला.

या दबावाअंती सरकारने ही कारवाई केली. पाकिस्तानच्या हवाई दलाने उत्तर वजिरीस्तान या अतिरेकीग्रस्त भागातील आठ अड्ड्यांवर बॉम्बहल्ले केले. त्यात उझबेक या आदिवासी समाजातील बरेचसे दहशतवादी मारले गेले. त्यामध्ये अबू अब्दुल रेहमान अल् मानी याचीही समावेश आहे. कराची विमानतळावरचा हल्ला त्याच्याच नेतृत्वाखाली झाला होता. गेल्या मंगळवारी पाकिस्तानच्या लष्कराने अशीच कारवाई केली होती आणि २५ दहशतवादी मारले होते.

Leave a Comment