केनिया – जगातील सगळ्य़ात मोठा हत्ती समजल्या जाणार्या ‘सताओ’चा मृत्यू झाला आहे. केनियातील या हत्तीचा शिकार्यांच्या विषारी बाणांमुळे मृत्यू झाला. सताओ मोठय़ा दातांचा जिवंत असलेला शेवटचा हत्ती होता . या प्रजातीच्या हत्तींचे दात लांब असतात व ते थेट जमिनीला टेकतात. सताओ उत्तर केनियाच्या सावो ईस्ट नॅशनल पार्कमध्ये राहत होता. शिकार्यांनी जीपीएस व मोबाइल फोनच्या मदतीने त्याचा ठाकठिकाणा शोधून काढला. त्याच्या निवासस्थानानजिकच्या परिसराच्या देखरेखीसाठी हवाई सर्वेक्षणासोबतच जमिनीवरही सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. एवढी खबरदारी घेतली जात असतानाही शिकारी मार्च महिन्यात सताओपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले. ५0 वर्षांच्या या हत्तीवर त्यांनी विषारी बाण सोडले. त्यानंतर तत्काळ पशूवैद्यकांचा चमू घटनास्थळी दाखल झाला. उपचारानंतर सताओ बराही झाला होता, पण काही दिवसांपूर्वी तो मृतावस्थेत आढळून आला. हा मृत हत्ती सताओच असल्याची पुष्टी अधिकार्यांनी केली आहे.