कोमातून बाहेर आला शूमाकर

shcumaker
पॅरिस – फॉम्युर्ला वन शर्यतीचे सात वेळा जगज्जेतेपद पटकावणा-या जर्मनीचा मायकेल शुमाकर अखेर कोमातून बाहेर आला असून, त्याला सीएचयू ग्रेनोबेल रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला आहे. ग्रेनोबेल रुग्णालयाने एक प्रसिध्दीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.
मात्र रुग्णालयाने शूमाकरला कुठे हलवण्यात आल्याची माहिती दिलेली नाही. डिसेंबर २०१३ मध्ये फ्रान्सच्या आल्पस पर्वतराजीत स्किइंग करताना शूमाकर गंभीर जखमी झाला होता.

स्किइंग करताना तोल जाऊन त्याचे डोके दगडावर आपटले होते. शुमाकरला रुग्णालयात आणले तेव्हा तो बेशुध्द होता. स्किइंग करताना त्याने हेल्मेट घातली होती, त्यामुळे दुखापतीची तीव्रता काही अंशी कमी झाली. अन्यथा तो रुग्णालयापर्यंतही पोहोचू शकला नसता, असे त्यावेळी डॉक्टरांनी म्हटले होते.

सुरुवातीचे काही महिने शुमाकरची प्रकृती अत्यंत गंभीर होती. शुमाकर बद्दल काहीही सांगता येणार नाही असे त्यावेळी त्याच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र लढवय्या शूमाकर अखेर मृत्यूवर मात करण्यात यशस्वी ठरला आहे. शूमाकरचे कोमातून बाहेर येणे त्यांच्या जगभरातील चाहत्यांसाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे.

Leave a Comment