विधानसभा – जागावाटपावरून आघाडीत ‘कलगीतुरा’

mhvidhan-sabha
मुंबई – लोकसभा निवडणुकीत एकमेकांना सावरून घेताना,काही मतदारसंघात सहकार्य लाभले नाही अशी ओरड करणाऱ्या कॉंग्रेस -राष्ट्रवादीने नरेंद्र मोदींची लाट मान्य करीत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली मात्र आता लोकसभेत जागा कुणाला जास्त हा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जागावाटपासाठी वादाचा ठरला आहे.

एकीकडे एकत्र लढण्याची घोषणा करणाऱ्या या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून स्वबळावरच लढणार अशी गर्जना होण्याची दाट चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांनी आमचेच सरकार येणार अशी घोषणा केली नाही तोच राष्ट्रवादीने आम्हाला यंदा जादा जागा हव्यात हा पवित्रा घेतला आहे. परिणामी आघाडीत आता ‘कलगीतुरा ‘रंगणार अशी चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा राज्यात सुपडा होवूनही विधानसभा निवडणुकीत आमचीच सरशी होणार असल्याचा दावा कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जागा वाटपाचा प्रश्न प्रत्यक्ष मतदार संघातील राजकीय बलाबल तसेच नेतृत्वातील सामंजस्याने घेईल. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला मिळालेल्या यशामुळे राज्यातील आघाडीवर कोणत्याही प्रकारचा दबाव आलेला नाही, असे स्पष्ट केले नाही ,तोच राष्ट्रवादीची बैठकही रविवारी झाली त्यात लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या, यानुसारच जागावाटपाचे सूत्र विधानसभा निवडणुकीसाठी हवे असा ‘गजर’ करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी पक्षाची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. त्यात विधिमंडळ अधिवेशनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पक्षाच्या नेत्यांकडून येत्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला जादा जागा मिळाव्यात, अशी महत्वपूर्ण मागणी एकमुखाने करण्यात आली. त्यानुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते प्रफुल्ल पटेल काँग्रेसशी येत्या काही दिवसांत जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याची चर्चा आहे, त्याचबरोबर या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा मांडण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एलबीटी, मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण यांसारख्या मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment