क्रांतिकारकांच्या वंशजांच्या साथीने घुमला क्रांतीचा जयजयकार !

krantikari
पुणे – स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविले गेलेल्या पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंना क्रांतिकारकांच्या वंशजांचा पदस्पर्श झाला आणि पुन्हा एकदा क्रांतीचा जयजयकार घुमला. पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, गणेश खिंडीतील वीर चाफेकर स्मारक, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या ( सीआयडी) आवारामधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची कोठडी या ठिकाणांपासून क्रांतीचा वणवा पेटून देशभरात त्याच्या ज्वाला प्रज्वलित झाल्या. या ठिकाणांबरोबरच शनिवारवाडा, लालमहाल या ऐतिहासिक स्थळांना क्रांतिकारकांच्या वंशजांनी भेट दिली.

लोकमान्य टिळक यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्याच्या घटनेस शंभर वर्षे होत असल्याच्या निमित्ताने लोकमान्य टिळक स्मृती अभियान आणि लोकमान्य टिळक विचार मंच यांच्यातर्फे हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन शैलेश टिळक आणि नगरसेविका मुक्ता टिळक यांनी केले.

इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी प्रत्येक ऐतिहासिक ठिकाणांची माहिती क्रांतिकारकांच्या वंशजांना दिली. क्रांतिकारकांच्या वंशजांमध्ये ,महंमद सैद खान ,प्रशांत कर्वे ,सरबजीत नामधारी ,राजकुमारी कुसुम, चेतन आणि प्रशांत चाफेकर ,रवींद्र पिंगळे ,शशिधर कान्हेरे , जगमोहन आणि अभितेजसिंग ,सत्यशील राजगुरू ,असीम राठोड ,विजय सिसोदिया ,राजेंद्रनाथ बक्षी ,उदय खत्री ,मारुती सैद ,डॉ राकेश रंजन ,डी . पी राघव , मधु शर्मा आदी सहभागी झाले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी परदेशी कपड्यांची होळी केलेल्या ठिकाणी म्हणजे सावरकर स्मारकापासून ऐतिहासिक वास्तूंच्या भेटीला प्रारंभ करण्यात आला. सेवा मित्र मंडळातर्फे क्रांतिकारकांच्या वंशजांचा गौरव करण्यात आला. शाहीर हेमंत मावळे यांनी लोकमान्य टिळक यांच्यावरील पोवाडा गायला आणि वातावरण क्रांतिमय झाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकानंतर गणेश खिंडीतील वीर चाफेकर स्मारक येथे क्रांतिकारकांचे वंशज गेले. त्यांना चाफेकर बंधूनी रँडचा वध कसा केला, याची हकिगत ऐकविण्यात आली. यावेळी नगरसेवक राजू पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीक्रांतिकारकांच्या वंशजांचा सत्कार केला.

सीआयडीच्या आवारात वासुदेव बळवंत फडके यांची कोठडी आहे. त्या कोठडीलाआणि फडके यांच्या स्मारकाला भेट देण्यात आली. या ऐतिहासिक ठिकाणांनंतर शनिवारवाडा आणि लालमहाल या ऐतिहासिक वास्तूंनाही भेट दिली गेली. यावेळी नगरसेवक रवि धंगेकर यांनी क्रांतिकारकांच्या वंशजांचे स्वागत केले.