पुणे – देशातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात नाविन्याचा जास्तीत वापर करण्यात यायला हवा. त्याशिवाय देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथे केले.केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या अखत्यारितील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेच्या नव्या वास्तूचे अनावरण, संस्थेचा तिसरा पदवीदान समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, आयसरचे संचालक के. गणेश, गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष टी.व्ही. रामकृष्णन आदी उपस्थित होते.
उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात नाविन्य स्वीकारणे आवश्यक – राष्ट्रपती
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले, भारताला संशोधनांची अतिशय प्राचीन अशी परंपरा आहे. नालंदा, तक्षशीला अशी शहरे केवळ विज्ञान आणि संशोधनासाठी प्रसिद्ध होती. पण संशोधनाची ही परंपरा खंडित झाली. त्यामुळे विकास आणि प्रगतीत भारताची पिछेहाट झाली आहे. पण आता पुन्हा एकदा संशोधनावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. विज्ञानाच्या मुलभूत शाखांचा विकास व्हावा यासाठी देशातील विविध शहरांत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक एज्युकेशन अँड रिसर्चसारख्या संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत.
देशात चांगल्या संस्था उभ्या करण्यात येत आहेत. उच्च दर्जाचे आणि अनुभवी शिक्षकही आहेत. पण आपल्या संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिल्या दोनशे नामवंत संस्थांत एकाही भारतीय संस्थेचा समावेश नाही, या परिस्थितीत बदल होण्याची आवश्यकता आहे, असे सांगून राष्ट्रपती म्हणाले, युवाशक्ती देशाचे बलस्थान आहे. या युवाशक्तीला उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही दिशांनी उच्च शिक्षणाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती फार मर्यादीत आहे. त्यामुळे आपण गुणवत्ता आणि कल्पनांच्या जोरावरच आर्थिक महासत्ता बनू शकतो. त्यासाठी चांगल्या उच्च शिक्षणाची गरज आहे. आयसर ही गरज भरून काढेल, असे सांगितले.
आपल्या देशाची सध्याची अर्थव्यवस्था सेवा उद्योगावर आधारित आहे. ही अर्थव्यवस्था ज्ञानावर आधारित उद्योगावर बदलायची असल्यास त्यासाठी उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची गरज आवश्यक आहे. देशातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याकडेही लक्ष दिले जाणार असल्याचे केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते आकाश गुरू यांस सुवर्णपदकांने गौरविण्यात आले. त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांनाही पदवी प्रदान करण्यात आल्या.