ओबामांच्या लोकप्रियतेला ओहोटी

obama
वॉशिंग्टन – अमेरिकेत करण्यात आलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार राष्ट्रपती बराक ओबामा यांची लोकप्रियता वेगाने घटत चालली आहे. सीएनएन ओआरसी तर्फे केल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात ही बाब नमूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार ओबामा हेही आता जॉर्ज बुश यांच्या इतकेच अमेरिकनांसाठी नावडते नेते ठरले आहेत. ५१ टक्के अमेरिकनांनी ओबामा हे बुश यांच्याच मार्गावर चालले असल्याचे मत व्यक्त केले आहे.

ओबामांना पसंती देणार्‍या नागरिकांचे प्रमाण ४७ टक्के आहे तर जॉर्ज बुश यांना पसंती देणार्‍यांचे प्रमाण ४६ टक्के आहे. मात्र यात फरक असा की बुश व्हाईट हाऊस मधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत किंचित वाढच दिसून आली आहे तर ओबामांची लोकप्रियता मात्र घटली आहे. सर्वक्षणाचे प्रमुख किटींग हॉलंड यांच्या मते सीएनएनच्या सर्वेक्षणात बहुदा प्रथमच अमेरिकनांनी बहुमताने ओबामा यांच्यावरील नाराजी व्यक्त केली आहे.

तुलनेने माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना अजूनही ६८ टक्के नागरिकांची पसंती आहे तर माजी अध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू यांना ५८ टक्के नागरिकांची पसंती आहे. माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांची लोकप्रियताही घटली असून मार्च २०१३ मध्ये ती ६७ टक्के होती ती आता ५५ टक्कयांवर आली आहे.

Leave a Comment