आरोग्य पर्यटनात भारत पाच वर्षात नंबर वन

healthtourism
जागतिक पातळीवर आरोग्य पर्यटनात भारत २०१७ पर्यंत पहिल्या नंबरवर पोहोचेल असे एसआरआय इंटरनॅशनल तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. पर्यटन व्यवसायात दरवर्षी २० टक्के इतकी वाढ होत असून जगभरातील या उद्योगाची उलाढाल ४३९ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यातील आरोग्य पर्यटनाचा वाटा ३२ अब्ज डॉलर्स इतका आहे. ही संस्था अमेरिकेतील सेवाभावी संस्था असून त्यांचे स्वतंत्र संशोधन आणि इनोव्हेशन सेंटर आहे. ही संस्था सरकार आणि उद्योजकांसाठी सर्वेक्षणे करत असते.

भारतात आरोग्य पर्यटनासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. भारतात प्रामुख्याने शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक पर्यटन अशा तीन प्रकारात आरोग्य पर्यटनाच्या सोयी दिल्या जातात. या क्षेत्रातील पर्यटनाचा भारताचा वाटा १८ अब्ज डॉलर्स इतका आहे आणि येत्या चार वर्षात त्यात किमान ५० टक्के वाढ नोंदविली जाईल असेही या सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जागतिक पर्यटन क्षेत्रात आरोग्य पर्यटनाचा विकास अधिक वेगाने होत आहे.

भारतीयांना आरोग्यासंबंधीचे चांगले ज्ञान आहे. विविध औषध पद्धतींचा वापर भारतात शेकडो वर्षांपासून केला जात आहे आणि निसर्गोपचार ही भारताची खासियत आहे. नेचरोपथी ही भारताला मोठी देणगी असल्याचे इंडियन बिझिनेस कौन्सिलचे अध्यक्ष पारस शहादपुरी यांनी सांगितले.

Leave a Comment