पावसाचे स्थान

monsoon
पावसाळा जवळ आला की, किती पाऊस पडणार याविषयी उत्कंठा निर्माण होते. तो कमी पडणार असेल तर चिंता वाटायला लागते. काही लोक तर परंपरा चालत आली आहे म्हणून पावसाच्या नावाने रडायला लागतात. काही वेळा असा प्रश्‍न पडतो की, पाऊस थोडा बहुत कमी पडला म्हणून आपण लगेच चिंता व्यक्त करावी अशी खरीच स्थिती आहे का ? यंदाच्या पावसाळ्याचा सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा अंदाज समोर येताच काही अर्थतज्ज्ञांनी चिंेता व्यक्त करायला सुरूवात केली. पावसाळा सामान्य न झाल्यास सरकार काय करणार ? सरकारला आता कठीण स्थितीला तोंड द्यावे लागेल असे इशारे देण्यास त्यांनी सुरूवात केली. भारताचे अर्थमंत्री भारतीय शेतकर्‍यां प्रमाणेच आभाळाकडे डोळे लावून बसलेले असतात असे सतत म्हटले जात असते. एका अर्थाने ते पूर्वी खरेही होते पण आता स्थिती बदलली आहे. आता पावसाळा चार दोन टक्क्यांनी कमी झाला म्हणून भारताचे अर्थमंत्री फार चिंतेत पडतील अशी काही स्थिती राहिलेली नाही. एक काळ असा होता की, देशाच्या वट्ट राष्ट्रीय उत्पन्नात ८० टक्के हिस्सा शेतीचा होता. पावसात काही कमी जास्त झाले की या व्यवसायाला धक्का बसायचा आणि एकुणच अर्थव्यवस्थेत घट यायची. पण देशाचे वट्ट राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे. ते आता शेतीवर अवलंबून नाही. देशाच्या वट्ट राष्ट्रीय उत्पन्नात शेती उत्पादनाचा वाटा कमी कमी होत आहे.

शेतीतली उत्पादनवाढ तीन ते साडेतीन टक्के आहे आणि अन्य क्षेत्रातली उत्पादन वाढ १० टक्के ते २० टक्क्यापर्यंत आहे. त्यामुळे शेतीचे एकुण उत्पादन वाढत असताना दिसत असले तरीही एकुण उत्पादनातला तिचा वाटा २० टक्क्या पर्यंत खाली आला आहे. याचा अर्थ असा होतो की, पावसाळा सामान्य नसला की या २० टक्क्यात एक ते दोन टक्क्यांची घट होते. पावसाने दगा दिल्याने वट्ट राष्ट्रीय उत्पादनात एक दोन टक्क्यांनी कमी आली म्हणून अर्थमंत्र्यांनी कपाळाला हात लावून बसण्याची काही गरज नाही. तशी एक दोनच काय पाच दहा टक्क्यांची घट तर इतरही अनेक क्षेत्रात येतच असते. त्यामुळे अर्थमंत्र्यांना काळजी घ्यावी लागेल पण अगदीच काही निरुपायाची स्थिती आलीय असे म्हणता येत नाही. या चिंता आणि पारंपरिक अंदाजा आडाख्यांचा आता आपण बदललेल्या स्थितीत नवा विचार करायला हवा आहे. यातला सर्वात महत्त्वाचा भाग असा की भारतातली शेती पावसावर अवलंबून असली तरीही ती आता वरचेवर पावसापासून मुक्त होत आहे आणि देशातल्या बागायत जमिनीचे प्रमाण वाढत चालले आहे.

त्यामुळे चार दोन टक्के पाऊस कमी पडला म्हणून शेतकरी विस्थापित होतो अशी काही स्थिती राहिलेली नाही. शेतीच्या क्षेत्रातही प्रगती होत आहे. नवे तंत्रज्ञान वापरून शेतकरी पाण्याच्या टंचाईवर मात करत आहेत. त्या साठी करावयाच्या प्रयोगाची माहिती घेत आहेत. गतवर्षी शिरपूर पॅटर्नसारख्या प्रयोगांनी शेतकर्‍यांना वा हुरूप आला आहे. आपले गाव आणि शेती दुष्काळातून कायमची मुक्त करणे हे काही फार दुरापास्त नाही याची जाणीव त्यांना होत आहे. त्यामुळे थोडा पाऊस कमी झाला म्हणजे दुष्काळच पडतो असे नाही. हळुहळु ती स्थिती येत आहे. पावसाळा कमी झाला की ग्रामीण भागावर अवकळा पसरते असाही एक समज आहे. पण आता ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीपासून बर्‍यापैकी मुक्त होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेती शिवाय अन्य मार्गांनी पैसे कमावणारे अनेक नवे घटक पुढे येत आहेत. गावागावात रिक्षा, जीप यांच्यातून लोकांची वाहतूक करणे, शिक्षण, बँका, कपडा, बांधकाम या व्यवसायातली ग्रामीण भागातली उलाढाल वाढत आहे. शेतीशिवाय अन्य व्यवसायात रोजगार मिळणे हे या अर्थव्यवस्थेला पोषक ठरले आहे कारण त्यामुळे रोजगार वाढला आहे आणि स्पर्धेतून शेतातलाही रोजगार वाढत आहे. परिणामी शेती शिवाय अन्य मार्गांनी येणारा पैसा गावात वाढत आहे. त्यामुळे थोडा पाऊस कमी पडला म्हणून सारी काही वाताहत होण्याचे संकट कोसळत नाही.

एखाद्या भागात ठार दुष्काळ पडला तर शेतीवर अवलंबून असलेला वर्ग त्रस्त होतो पण त्यासाठी मोठाच दुष्काळ पडला पाहिजे. थोड्या बहुत कमी पावसाने असे होत नाही. सध्या आपल्या देशात आपल्या गरजेपेक्षा अधिक धान्य पिकत आहे. त्यामुळे सरकारकडे धान्याचे मोठे साठे पडून असतात. गेल्या पाच सहा वर्षात आपण या गोष्टीचा अनुभव घेत आहोत. सरकारी गोदामात धान्य सडत आहे. साखरेचे उत्पादन जास्त होत आहे. त्यापोटी शेतकर्‍यांना काय मिळते आणि त्यांना न्याय मिळतो की नाही हे वेगळे विषय आहेत पण पावसाचे प्रमाण कमी झाले की सरकारने एकदम हातपाय गाळले पाहिजेत अशी काही स्थिती नाही. सरकारने आता याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण आपल्या देशातली शेती एवढी सुधारली पाहिजे की ती एखादा दुष्काळ पडला म्हणून उद्ध्वस्त होता कामा नये. ही गोष्ट शक्यही आहे. जगातल्या अनेक देशांनी ही गोष्ट करून दाखवली आहे. आपणच अजून दुष्काळ नावाचे एक मध्ययुगीन संकट सांभाळत बसलो आहोत. दुष्काळ पडतो ही कल्पना आणि तिची अपरिहार्यता यांना आता काही अर्थ राहिलेला नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने त्यातून मार्ग काढला आहे. आपण अजूनही तेच तेच विचार कवटाळून बसलो आहोत.

Leave a Comment