मुंबईतील पहिल्यावहिल्या हेलीपोर्टला सेनेचा विरोध

heliport
मुंबई – मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेतील कांही भागावर राज्यातील पहिलेवहिले हेलिपोर्ट उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास मंडळाने घेतला असून त्यासाठी मुंबई महापालिकेच्या ताब्यात असलेल्या या जागेचे हस्तांतरण केले जावे यासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र या जागी हेलीपोर्ट उभारण्यास यवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी विरोध केला असून या विरोधाचे काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी समर्थन केले आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे व्हीव्हीआयपी यांची सतत वर्दळ असते आणि येथे एअर ट्रॅफिकही खूप आहे. यामुळे हेलिकॉप्टर लँडींगला अनेक अडचणी येतात. त्यामुळे राज्यात हेलीपोर्ट उभारण्याचा निर्णय विमानतळ मंडळाने घेतला आहे. दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर आत्तापर्यंत घोड्यांच्या रेस होत असत. याजागी आता पार्क करण्याचा सेनेचा विचार आहे. २२५ एकरांची ही जागा मुंबई महापालिकेच्या ताब्यात आहे. त्यातील १९ एकर जमीन हेलीपोर्टसाठी मागितली गेली आहे.

आदित्य ठाकरे यांनी मात्र व्हीव्हीआयपींची सोय महत्त्वाची नाही कारण ही जागा मुंबईकरांची आहे आणि आमच्यासाठी प्रत्येक मुंबईकर व्हीआयपीच आहे असे बजावताना येथे पार्क बनविले जाईल असे जाहीर केले आहे. प्रिया दत्त यांनीही मुंबईकर या नात्याने मुंबईतील मोकळी जागा मुंबईकरांसाठीच वापरली गेली पाहिजे असे सांगून आदित्य यांचे समर्थन केले आहे.

Leave a Comment