महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचा १४४ जागांवर दावा

bjpback
मुंबई – आक्टोबरनंतर कधीही महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात हे लक्षात घेऊन सेना भाजप युतीने जागावाटपासंदर्भातल्या चर्चेला सुरूवात केली आहे. मात्र भाजप यावेळी १४४ जागांवर आपला हक्क सांगण्याबाबत आग्रही असल्याने सेना भाजप युती टिकणार की तुटणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी हे जागावाटप सेना १७१ जागा व भाजप ११७ जागा असे होते.

गेली २५ वर्षे राज्यात सेना भाजप युती आहे. भाजपने लोकसभेसाठी जादा जागा लढवायच्या तर सेनेने विधानसभेसाठी जादा जागा लढवायच्या असा अलिखित करार आहे. आत्तापर्यंतची युतीची वाटचाल याच भूमिकेनुरूप सुरू होती. मात्र मोदी लाटेमुळे भाजपचा राज्यातील जनाधार खूपच वाढला आहे आणि त्यासाठी भाजपला सेनेबरोबरीने म्हणजे निम्म्या निम्या जागा हव्या आहेत. विधानसभेत ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अथवा विरोधी पक्ष नेता असाही युतीत करार आहे. मात्र २००९ च्या निवडणुका कमी जागा लढवूनही सेनेपेक्षा भाजप आमदारांची संख्या अधिक होती. परिणामी विरोधीपक्षनेते पद भाजपकडे राहिले होते.

यंदा मात्र मोदी लाटेवर स्वार होऊन राज्यातील भाजप नेते मुख्यमंत्रीपदावरचा आपला दावा मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी जागावाटपाची बोलणी सुरू करण्यात आली असून राज्यात भाजपला २७ जागा अधिक दिल्या गेल्या तर सेनेला केंद्रात दोन जास्त राज्यमंत्रीपदे देण्याचा प्रस्ताव ठेवला गेला असल्याचे समजते. केंद्रात सध्या सेनेला फक्त एकच कॅबिनेट मंत्रीपद आहे आणि त्या खात्यावर सेना नेते नाराज आहेत. यामुळे भाजपचा हट्ट कमी झाला नाही तर राज्यात युती तुटण्याचीच शक्यता अधिक असल्याचेही तज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment