देशाबाहेर जाण्यास मुशर्रफ यांना परवानगी

musharraf
कराची – पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना देश सोडून बाहेर जाण्यास जी बंदी घातली गेली होती ती सिंध हायकोर्टाने उठविली आहे. न्यायमूर्ती मोहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती शाहनवाझ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचे आरोप असून त्यासंबंधात अनेक खटले त्यांच्यावर दाखल आहेत. ते परदेशात फरारी होतील म्हणून सरकारने त्यांच्यावर देश सोडून जाण्यास बंदी घातली होती आणि गेल्या ५ एप्रिलपासून त्यांचे नाव एक्झिट कंट्रोल लिस्ट मध्ये सामील केले होते. त्याविरोधात मुशर्रफ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपले नांव या यादीतून कमी करावे अशी विनंती केली होती. न्यायमूर्तींनी त्यांच्यावरील बंदी उठविल्याने आता ते आपल्या आजारी आईची भेट घेऊ शकतील असे मुशर्रफ यांच्या वकीलांनी सांगितले.

अर्थात या निकालाविरोधात सरकारला अपील दाखल करायचे असेल तर त्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे. त्यामुळे मुशर्रफ लगोलग देश सोडणार नाहीत तर अपीलाची मुदत संपल्यानंतरच ते याबाबतचा निर्णय घेतील असेही समजते.

Leave a Comment