
मुंबई – मुंबईच्या वरळी भागातील कॅम्पा कोला वसाहतीतल्या बेकायदा घरांचे पाडकाम १७ जूनपासून सुरू केले जाईल आणि या रहिवाशांच्या अडथळ्याची तमा न बाळगता ही कारवाई होईल, असे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे. या रहिवाशांना ही कारवाई होण्यापूर्वी मुंबई महानगरपालिका कायद्याचे कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली जाईल असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
कॅम्पा कोला रहिवाशांवर कारवाई होणारच
दि. १४, १५ आणि १६ या तीन दिवशी पाडकामाच्या नोटिसा बजावल्या जातील. या घरातील रहिवासी सर्वोच्च न्यायालयाने पाडकामाचा आदेश दिला असूनही घरे सोडायला तयार नाहीत आणि सत्याग्रहाचे नाटक करून घरे बळकावून बसण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा भावनिक प्रश्न झाला आहे आणि तो जबाबदारी हाताळावा लागणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
हे रहिवासी घर सोडत नसतील तर आधी त्यांची वीज कापली जाईल, नंतर गॅस सप्लाय बंद केला जाईल आणि शेवटी पाणी पुरवठा बंद करून त्यांना जागा सोडण्यास भाग पाडले जाईल. नंतर घरांच्या आतील भिंती पाडल्या जातील आणि शेवटी बाल्कनी पाडून घरे उद्ध्वस्त केले जातील. या कामावर महापालिकेला सुद्धा दोन कोटी रुपये खर्च येत आहे. हा खर्च याच वसाहतीतल्या वैध रहिवाशांकडून वसूल केले जाणार आहे.
