मुंबई – सागरी, डोंगरी आणि नागरी विभागांमध्ये विस्तारलेल्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाणे जिल्हयाचे विभाजनाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.त्यामुळे राज्यात ३६ वा जिल्हा अस्तित्वात येणार आहे.
ठाणे जिल्हा विभाजनाला मंजुरी ;राज्यात आता ३६ वा जिल्हा
प्रस्तावित नवीन जिल्ह्यात पालघर, वसई, डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा, मोखाडा आणि विक्रमगड या आठ तालुक्यांचा समावेश असेल. मूळ ठाणे जिल्ह्यात नव्या रचनेत ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर हे सात तालुके राहणार आहे. साधारणपणे अडीच महिन्यांत पालघर जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. परंतु त्यानंतर तिथे ५६ कार्यालये सुरू करावी लागतील, ४३०० अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल. त्यासाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. या जिल्हा विभाजनासाठी राज्य सरकारवर सुमारे ४३० कोटी रुपये खर्चाचा बोजा पडणार आहे. मात्र त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे
नव्या जिल्ह्याचे मुख्यालय पालघरमध्ये रहाणार असून, पालघर हा महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा असणार आहे. लवकरच विधानसभेत या निर्णयाची घोषणा होईल. गेल्या वर्षभरापासून ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा होती. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे हा निर्णय रखडला होता.ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज १९८५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात मोठा जिल्हा असून, या जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ आणि २४ विधानसभा मतदारसंघ येतात. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून दोन जिल्हे निर्माण करण्याची प्रक्रिया येत्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत दिले होते.