सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या वसतिगृहांमध्ये मोफत ‘वायफाय’ सुविधा

wifi
मुंबई – राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या वसतिगृहांमध्ये वायफाय सेवा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या निर्णयानुसार 1600 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी इंटरनेटचा वारंवार वापर करावा लागतो. त्यासाठी अनेक विद्यार्थी आपला स्वत:चा लॅपटॉप बाळगतात. त्यामुळे त्यांना मोफत वायफाय सेवा देण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

विद्यार्थी वसतिगृहांच्या विकासासाठी काय करता येईल, याची चर्चा या बैठकीत करण्यात आली. त्याचवेळी वसतिगृहांमध्ये मोफत वायफाय उपलब्ध करून देण्याचा विचार पुढे आला. ही सुविधा सर्व महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी किती खर्च येईल, याची चाचपणी वैद्यकीय शिक्षण संचालकांना करण्यास या बैठकीत सांगण्यात आले.त्यानुसार वायफाय सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्याचे या बैठकीत ठरले. राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वसतीगृहात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment